मुख्यपान » धर्म
A+ R A-

धर्म

ई-मेल प्रिंट
धर्म.

आलोकस्तिमिरे विपद्विषमणि: पाते करालंबनं
याश्चाकल्पतरूर्जगज्जरथ: पाथेयमन्ते पथि।
दु:खव्याधिमहौषधं भवभयोद्भांताशयाश्वासनं
तापे चंदनकाननं स्थिरसुहृद्धर्म: सतां बांधव:।।
(क्षेमेंद्र महाकवि. अवदान कल्पलता)


धर्म हा अंधकारांत प्रकाश आहे; विपत्तिरूपी विषाचा नाश करणारा मणि आहे; पडलेल्याला हात देणारा आहे; इच्छेचें फल देणारा हा कल्पतरू आहे; जगताचा जय करणारा हा जणूं रथ आहे; परलोकप्रवासाची शिदोरी, दु:खरूपी व्याधीचें महौषध; भवभयानें भ्रांत झालेल्या अंत:करणाला आश्वासन; दाह झाला असतां चंदनवन; हा कायमचा मित्र आहे; आणि हा सज्जनांचा (खरा) बांधव आहे.

सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंदा।
सचित्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं।।१।।


सर्व पापपासून विरत होणें, (सर्व) कुशलाचा (पुण्याचा) संचय करणें आणि स्वचित्ताचें दमन करणें हें बुद्धाचें अनुशासन होय.(धम्मपद)

बुद्धानें उपदेशिलेल्या धर्ममार्गाचा सारांश ह्या गाथेंत सांगितला आहे. ‘सर्व पापापासून विरत होणें’ ह्मणजे शीलाचें रक्षण करणे; कुशलाचा संचय करणें’ ह्मणजे समाधि साध्य करणें;  आणि ‘स्वचित्ताचें दमन करणें’ ह्मणजे प्रज्ञा संपादन करणें होय. अर्थात् शील, समाधि आणि प्रज्ञा ह्या त्या धर्ममार्गाच्या तीन मुख्य पायर्‍या होत. यांनाच अनुक्रमें ‘अधिशीलशिक्षा’ ‘अधिचित्तशिक्षा’ आणि ‘अधिप्रज्ञाशिक्षा’ असें ह्मणतात. ह्या तीन शिक्षांत सगळ्या बौद्धधर्माचा अंतर्भाव होतो. गेल्या व्याख्यानांत सांगितलेल्या आर्यअष्टांगिकमार्गाच्या आठहि अंगांचा या तीन शिक्षांतच समावेश होतो. सम्यक् वाचा, सम्यक् कर्मात आणि सम्यक् आजीव या तीन अंगांचा अधिशीलशिक्षेंत समावेश होतो; सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या तीन अंगांचा अधिचित्तशिक्षेंत समावेश होतो; व सम्यक् दृष्टी आणि सम्यक् संकल्प या दोन अंगांचा अधिप्रज्ञाशिक्षेंत समावेश होतो.

आजच्या या व्याख्यानांत बुद्ध, धर्म व संघ या रत्नांपैकीं दुसर्‍या रत्नाची ह्मणजे धर्माची माहिती सांगावयाची ती मी वरील शिक्षात्रयीच्या द्वारें सांगणार आहें. तेव्हां आतां अधिशीलशिक्षा किंवा शील ह्मणजे काय याचा प्रथमत: विचार करुं. बौद्ध समाजांतील पुरूषांचे गृहस्थ, उपासक, श्रमणेर आणि भिक्षू असे चार भेद आहेत. त्याचप्रमाणें गृहिणी, उपासिका, श्रामणेरी आणि भिक्षुणी असे स्त्रियांचेही चार वर्ग केले आहेत. पैकीं भिक्षुचा आणि श्रामणेरीचा वर्ग आजला अस्तित्वांत नाहीं. बाकी सहा वर्ग ब्रह्मदेश, सिलोन वगैरे देशांतील बौद्ध लोकांत आढळतात. यांतील भिक्षूंला आणि श्रमणेरांला लागू पडणारा जो अधिशीलशिक्षेचा भाग त्याचा आह्मांस येथें विचार करण्याची जरूरी वाटत नाहीं. एकतर तसें केल्यानें आजच्या विषयाचा फऱच विस्तार होणार आहे; व दुसरें त्यपासून आपणाला तादृश फायदा होण्यासारखा नाही. तथापि ज्यांची तशीच जिज्ञासा असेल त्यांनीं विनय ग्रंथाचें “Sacred Books of the East”  मध्यें प्रसिद्ध झालेलें भाषांतर वाचावें.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..