मुख्यपान » संघ भाग २ रा
A+ R A-

संघ भाग २ रा

ई-मेल प्रिंट
(१भाग २ रा)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- बुद्ध भगवंतांच्या परिनिर्वाणानंतर अशोक राजाच्या कारकिर्दीपर्यंत संघाची संक्षिप्त माहिती वाचकांसमोर ठेवण्याच्या उद्देशानें हा भाग मूळ व्याख्यानांस जोडला आहे.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बुद्ध भगवंताच्या हयातींतच त्यांचा धर्म २मध्यदेशांत चोंहोकडे पसरला होता. बौद्ध भिक्षू विशेषत: संभाषणाच्या द्वारें धर्मप्रसार करीत असत. आजकालच्या प्रमाणें सभा भरवून ते व्याख्यानें देत नसत. जेथें जेथें धर्मश्रवण करणार्‍या व्यक्ती मग ती एक असो किंवा अनेक असोत-त्यांना भेटत, तेथें तेथें ते त्यांस उपदेश करीत. लोकांशीं त्यांची वर्तणूक कशा रीतीची होती, हें पूर्ण भिक्षुच्या पुढील गोष्टीवरून वाचकांच्या चांगलें लक्षांत येण्यासारखें आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२- पूर्वेस भागलपुर, पश्चिमेस गांधार, उत्तरेस हिमालय आणि दक्षिणेस विंध्यपर्वत, यांच्या मधील प्रदेशास मध्यदेश ह्मणत असत.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्ण नांवाचा बुद्धांचा एक शिष्य होता. तो एके दिवशीं बुद्ध भगवांतांपाशीं आला, आणि आपणास संक्षेपानें धर्मोपदेश करावा अशी त्यानें त्यांस विनंति केली. उपदेश संपल्यावर बुद्ध भगवान् ह्मणालेः- पूर्णा, आतां तूं कोणत्या प्रदेशास जाणार आहेस?

पूर्णः- भगवान्, ह्या आपल्या उपदेशाचें ग्रहण करून मी आतां सुनापरंत नांवाच्या प्रदेशास जाणार आहें.

बुध्दः- पूर्णा सुनापरंत प्रांतांतील लोक मोठे कठोर आहेत, मोठे क्रूर आहेत, ते जर तुला शिव्या देतील, तुझी निंदा करितील, तर तुला त्या वेळीं काय वाटेल?

पूर्णः- त्या वेळीं, हे भगवन् हे लोक फार चांगले आहेत; कारण ह्यांनीं माझ्यावर हातानें प्रहार केले नाहींत, असें मला वाटेल.

बुध्दः- आणि जर त्यांनीं तुझ्यावर हातानें प्रहार केला तर ?

पूर्णः- मला त्यांनी दगडांनीं मारलें नाहीं ह्मणून ते लोक चांगलेच आहेत असें मी समजेन.

बुध्दः- आणि दगडांनीं मारलें तर ?

पूर्णः- माझ्यावर त्यांनीं दंडप्रहार केला नाहीं  ह्मणून के फार चांगले लोक आहेंत असें मी मानीन.

बुध्दः- आणि दंडप्रहार केला तर ?

पूर्णः- शस्त्रप्रहार केला नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे, असें मी समजेन.

बुध्दः- आणि शस्त्रप्रहार केला तर ?

पूर्णः- मला ठार मारलें नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे, असें समजेन.

बुध्दः- आणि तुला ठार मारलें तर 

पूर्णः- भगवन् कित्येक भिक्षू ह्या शरीराला कंटाळून आत्मघात करितात. अशा शरीराचा जर सुनापरंतच्या रहिवाशांनीं नाश केला, तर त्यांनीं माझ्यावर उपकार केला असें होईल, आणि ह्मणून ते लोक फार चांगलेच, असें मी समजेन.

बुध्दः- साधु(शाबास), पूर्णा साधु। अशा प्रकारच्या शमदमानें युक्त होत्साता तूं सुनापरंत प्रदेशांत धर्मोपदेश करण्यास समर्थ होशील.

(मज्झिमनिकाय)

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..