मुख्यपान » समाधिकार्य
A+ R A-
ई-मेल प्रिंट


समाधिकार्य

इति खो मिक्खवे समाधि मग्गो असमाधि कुमग्गो ति ॥

--- अंगुत्तर.  छक्कनिपात.

सन्मनोवृत्तींत समाधान ठेवणें हें समाधीचें कार्य होय.  सदोष असून दुःखोत्पादक मनोवृत्ति असन्मनोवृत्ति; आणि निर्दोष असून ज्या सुखोत्पादक त्या सन्मनोवृत्ति होत.  यांला बौद्धवाङ्‌मयांत अनुक्रमें अकुशलधर्म आणि कुशलधर्म म्हणतात.  अकुशल कार्यप्रवृत्ति, वाक्प्रवृत्ति आणि मनःप्रवृत्ति कोणत्या ?  असा पसेनदि कोसल राजानें प्रश्न केला असतां आनंद म्हणाला, 'महाराज, ज्या सदोष त्या.'  प. -- पण सदोष कोणत्या ?  आ. -- ज्या सामय त्या.  प.-- सामय कोणत्या ?  आ.-- ज्या दुःखोत्पादक त्या.  प.-- दुःखोत्पादक कोणत्या ?  आ.-- महाराज, ज्यांहीं करून आपणाला दुःख होतें, परक्याला दुःख होतें, किंवा उभयतांला दुःख होतें,  त्या प्रवृत्ति दुःखकारक होत.  प.-- आणि भदंत, कोणत्या कार्यप्रवृत्ति, वाक्प्रवृत्ति आणि मनःप्रवृत्ति कुशल समजाव्या ?  आ.-- ज्या निर्दोष त्या.  प.-- आणि निर्दोष कोणत्या ?  आ.-- ज्या अनामय त्या. प.-- अनामय कोणत्या ?  आ.-- सुखोत्पादक त्या. प.-- सुखोत्पादक कोणत्या ?  आ.-- महाराज, ज्यांहीं करून आपणाला दुःख होत नाहीं; परक्याला दुःख होत नाहीं, किंवा उभयतांला दुःख होत नाहीं. त्या प्रवृत्ति सुखकारक होत.'१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  मूळ संवाद मज्झिमनिकायांतील बाहितिकसुत्तांत (८८) आहे.  तो बराच विस्तृत आहे.  येथें केवळ सारांश दिला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हाच अर्थ दुसर्‍या रीतीनें सांगावयाचा म्हटला म्हणजे लोभमूलक, द्वेषमूलक आणि मोहमूलक प्रवृत्ति अकुशल, व परोपकारमूलक, प्रेममूलक आणि ज्ञानमूलक प्रवृत्ति कुशल समजाव्या.  अकुशल आणि कुशल याजमध्ये मोठा फरक हा की, अकुशलप्रर्तक लोभ, द्वेष आणि मोह या तिघात एकवाक्यता नाही, व ती कुशलप्रवर्तक परोपकार (अलोभ), प्रेम (अद्वेष) आणि ज्ञान (अमोह) या तिघात पूर्णपणे आढळते.  किंबहुना, अशा एकवाक्यतेनेच यांचा उत्कर्ष होत असतो.  उदाहरणदाखल लोभ आणि द्वेष घ्या.  या दोन अकुशल मनोवृत्तीचे कधीही पटत नाही.  ज्या वेळी मनुष्य लोभाभिभूत होतो, त्या वेळी त्याला क्रोध येणे शक्य नाही, व ज्या वेळी तो क्रोधाविष्ट होतो त्या वेळी परार्थाप्रमाणे स्वार्थावरही पाणी सोडण्यास तयार असतो.  लोभ आणि द्वेष या दोघांबरोबरही मोह राहू शकतो.  पण त्यांचे पर्यवसान आळसातच होत असल्यामुळे तो या मनोवृत्तीला साधक न होता बाधकच होतो.  याच्या उलट कुशलप्रवर्तक परोपकार आणि प्रेम हे दोघे परस्पराला अत्यंत पोषक होतात, आणि त्यांना ज्ञानाची मदत मिळाली तर त्यांचा आणि ज्ञानाचा सारखाच विकास होतो.

अकुशल मनोवृत्तीचा पूर्ण निरोध करून कुशल मनोवृत्तीचा अत्यंत विकास करणे, व त्यातही लिप्‍त न होणे, हे बौद्धधर्मांचे ध्येय आहे.१ परंतु जर समाधीने समाधान ठेवण्याचे किंवा स्मृतीने पहारेकर्‍यांचे काम केले नाही, तर अकुशल मनोवृत्तींना आत घुसण्यास अवकाश मिळतो, व तेणेकरून कुशल मनोवृत्ति विस्कळीत होतात.  कुशल मनोवृत्तीचे एकीकरण कशा प्रकारे केले पाहिजे यासंबंधी त्रिपिटक ग्रंथांत बर्‍याच उपमा सापडतात; त्यापैकी एकदोन येथे देतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा ।
सचित्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं ॥
या गाथेत हेच ध्येय वर्णिले आहे- बुद्ध, धर्म आणि संघ, (आवृत्ति २) पृष्ट २४ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..