मुख्यपान » बालपणांतील कांहीं गोष्टी
A+ R A-

बालपणांतील कांही गोष्टी

ई-मेल प्रिंट
माझा जन्म गोव्यामधील सासष्ट प्रांतांतील साखवाळ या गांवी ता. ९ ऑक्टोबर १८७६ या दिवशीं पहांटेस चार वाजण्याच्या सुमारास झाला. आईचें नांव आनंदीबाई; व वडिलांचे दामोदर. आम्ही सात भावंडें; पैकीं दोन मुलगे न पांच मुली. या सात भावंडांत मी शेवटचा. जन्मल्यानंतर आई आजारी पडल्यामुळें आईचें दूध न मिळतां दाईच्या दुधावरच प्राणरक्षण करावें लागलें, असें सांगतात. सहा महिन्यांचा होतों, तेव्हां एकाएकीं डावा पाय सुजून त्यांत पू उत्पन्न झाला. कणसूव येथील रोकी मिस्कीत नांवाच्या वैद्यानें गुडघ्याच्या वरच्या बाजूस कापून त्यांतून पू बाहेर काढून तो बरा केला. परंतु तो कायमचा अशक्त होऊन राहिला.

आमचे आजोबा रामचंद्र कोसंबे हे जेव्हां सांखवाळीस आले तेव्हां तो गांव ओसाड पडल्यासारखा होता. पण माझ्या बाळपणांत तेथें बरीच सुधारणा झाली होती. तथापि दोनचार दिवसांआड संध्याकाळीं सहा वाजल्यावर वाघाच्या आरोळ्या ऐकूं यावयाच्याच. आमच्या शेजारीं सुब्राय कामत यांचें लहानसें दुकान असे. दक्षिणेच्या बाजूस भिकू शेणवी संझगिरी यांचें घर आहे. त्यांनां मुलगा नव्हता. त्यांच्या दोन विधवा मुली व एक विधवा नात या त्यांच्या घरीं राहत असत. याशिवाय नारायण शेणवी संझगिरी हे आमचे शेजारी होते. (सध्या त्यांचे चिरंजीव त्यांच्या घरांत रहात असून मूळच्या घरांत त्यांनी बरीच दुरुस्ती केली आहे.) हीं तीन ब्राम्हणांचीं घरें खेरीज करून सातआठ हिंदू शूद्रांचीं व पांचसहा ख्रिस्ती शूद्रांची घरें आमच्या घराच्या आसपास होतीं. ख्रिस्ती मुलांबरोबर मी फार करून जात नसें. त्यांच्याबरोबर खेळण्यास वडिलांनींच मनाई केली होती असें वाटतें. पण हिंदू शूद्रांच्या मुलांबरोबर खेळण्यास सक्त मनाई केली नसावी. कारण त्यांजबरोबर कित्येक वेळां मी फिरत होतों अशी आठवण आहे. माझ्या सर्व सोबत्यांत किंबहुना गांवांतील सर्व मुलांत मी मंद होतो अशी प्रसिद्धि आहे. आठनऊ वर्षेपर्यंत तर मला धड जेवतां येत नसें. माझ्या सोबत्यांनीं मारलें असतां मी घरांत तक्रार आणीत नसें- अथवा मला ती आणतां येत नसे असें म्हणणें विशेष चांगलें. मला उद्देशून माझ्या वडिलांचे कांहीं दोस्त त्यांनां म्हणत असत, की हा मुलगा तुमच्या शिरावर एक ओझेच आहे असें आम्ही समजतों.

माझ्या वडिलांचे मत या मित्रांसारखें नसावें. सामान्य बापाची पूर्ण निराशा होण्याइतका मी मंद होतों, तरी माझ्या वडिलांनां मी हुषार निघेन अशी बळकट आशा वाटत होती. एका गांवठी ज्योतिष्यानें त्यांना, मी विद्वान होईन, पण धनवान् मात्र होणार नाहीं असें भविष्य कथन केलें होतें; व त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. निदान मी गांवचा कुळकर्णी (escrivao da comunidade) होईन असें त्यांना वाटे.

पुढे वाचा