मुख्यपान » तारुण्य
A+ R A-

तारुण्य

ई-मेल प्रिंट
“ किमस्ति कश्चिदसावियति लोके यस्य निर्विकारं यौवनम तिक्रान्तम् ।”
-कादंबरी.


[ भावार्थ – या अफाट सृष्टींत ज्याचें तारुण्य निर्विकार तर्‍हेनें गेलें, असा हा कोणी आहे काय ? ]

चवदा वर्षांचा मुलगा किंवा बारा वर्षांची मुलगी, यांस तरुण किंवा तरुणी म्हणणें पाश्चात्य देशांत हास्यास्पद होईल. आमच्या देशांत देखील, ऋषीकालीं, अशा अर्भकांनां तरुण किंवा तरुणी या संज्ञा वेड्या माणसांनें सुद्धा दिल्या नसत्या. पण काळाचा महिमा विचित्र आहे. आजला चवदा वर्षांच्या आया आणि सोळा वर्षांचे बाप या आर्यभूमींत किती तरी निघतील ! मग मी चवदाव्या वर्षीच तरुण झालों असें जर माझ्या महाराष्ट्रीय वाचकांना सांगितलें तर त्यांनीं आश्चर्य का मानावें ? मी तरुण झालों याचा अर्थ माझ्या शरीराची वाढ पूर्ण झाली असा मात्र कोणीं घेऊं नये. तारुण्यांतील जे मनोविकार, त्यांनीं माझ्या मनांत ठाणें बसविलें, तेवढाच त्याचा अर्थ. माझ्या कित्येक सोबत्यांची लग्नें झालेलीं;  इतर सोबती लग्नाचा इत्यर्थ काय असावा या गहण शोधांत गढून गेलेले; व कांहीं जणांनीं तर देवदासींच्या द्वारें वगैरे तारुण्यतत्त्वाचा बोध करून घेतलेला; अशा परिस्थितीत मीच तेवढा कोवळा-अपक्व-राहणें शक्यच नव्हतें.

माझ्या वडिलांनीं आमच्या घरापासून दीडदोन मैलांच्या अंतरावर नव्वद वर्षांच्या करारानें एक नारळीचा बगीचा खंडाला घेतला होता. तेथे ते दिवसांतून दोनदा जात असत. त्यांच्या बरोबर मीहि या बगीच्यांत जाऊं लागलों. तेथें मुख्य काम म्हटलें म्हणजे माकडांपासून आणि चोरांपासून नारळांचें रक्षण करणें हें होतें. आम्ही फावल्या वेळांत, पाटाचें पाणी चालू करणें, केळींस पाणी देणें, बगीच्याची भिंत मोडून पडली असल्यास ती दुरुस्त करणें, इत्यादि कामें करीत होतों. हलकेहलके मी माडावर चढावयाला शिकलों, व वडील घरीं नसलें म्हणजे या बगीच्यांत जाऊं लागलों. पण रात्र झाली म्हणजे मला भीती वाटे; व घरीं येतांना माडाची सुर काढणार्‍या भंडारी लोकांच्या सोबतीनें मला यावें लागे. या सोबतीचा अर्थातच माझ्यावर अति वाईट परिणाम झाला. मी ताडी पिऊं लागलों किंवा अन्य दुराचार करूं लागलों असें नव्हें. पण त्यांच्या आपसांतील अतिगलिच्छ भाषणाचा माझ्या मनावर दुष्परिणाम घडत असे, व त्यामुळें माझ्या मनांत कुकल्पना घोळूं लागल्या. घरच्या माणसांच्या दाबामुळें माझ्या हातून कायिक दोष घडले नाहीत; पण मानसिक दोष घडले, व त्यांची विषारी फळें मला आजपर्यंत भोगावीं लागत आहेत.

१८११ सालच्या शेवटीं किंवा १८९२ सालच्या आरंभी हळुहळू मला वाचनाची अभिरुचि लागूं लागली. असे होण्यास कोणी प्रवर्तक झाला नाही. आपोआपच माझें लक्ष्य वाचनाकडे वळलें. “ आरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी ” हे पुस्तक मी पहिल्यानें वाचूं लागलों. नंतर थोडक्याच वेळांत रामचंद्र पांडुरंग वैद्य यांचे “ पथ्यबोध ” मासिक पुस्तक माझ्या हातीं आलें. त्यांतील “ गुप्तरोग ” ही कविता माझ्या पथ्यावर पडली. पूर्वी ज्या गोष्टी सुखावह वाटत होत्या, त्या आतां दुःखकारक वाटूं लागल्या. मनःसमुद्रावर निराळ्या प्रकारचे तरंग उठूं लागले. पण नवीन विचारांचा पाया दृढ होतो न होतो इतक्यांत ( १८९१ च्या जून महिन्यांत ) माझें लग्न झालें ! तारुण्याचा शिक्का मजवर बसला !

पुढे वाचा