मुख्यपान » परिस्थिति
A+ R A-

परिस्थिति

ई-मेल प्रिंट
श्रीयुत भिकू पुंडलीक नाईक हे एका प्रसंगीं मला म्हणाले “ तूं जर युरोपांत जन्मला असतास, तर तुझ्या बुद्धीचें तेज पडलें असतें; पण येथें तिचा काय उपयोग ? माकडें राखण्यांतच तुझें सर्व आयुष्य खर्चणार  आहे !” त्यांनीं केलेल्या या भविष्यापलीकडे खुद्द माझ्या कल्पनेची धांव गेली नव्हती. मला वाटत होतें, कीं, आतां माझ्या हातून कोणतेंहि महत्त्वाचे काम होणार नाहीं. जेमतेम माझ्या कुटुंबाची सेवा माझ्या हातून झाली म्हणजे बस्स झालें. सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा, इत्यादि उपायांच्या द्वारें स्वदेशहित साधावें, असे कल्पनातरंग कधींकधीं उठत नव्हते असें नाहीं. पण क्षुद्र नराच्या कोपाप्रमाणें मनांतल्यामनांतच त्यांचा लय होत असे. आपल्या प्रांतापुरती कांहीं सुधारणा घडवून आणीवी, तर त्या कार्याला परिस्थिति अनुकूल नव्हती. उदाहरणार्थ, जांबावलीच्या शिमग्याकडे जे मठग्रामस्थ हिंदुबांधवांचे पैसे खर्च होतात, ते एका सार्वजनिक शाळेकडे व्हावे, असें माझें म्हणणें होतें. पण माझ्यासारख्याचें म्हणणें ऐकतो कोण ? जांबावलीचा शिमगा बंद तर झाला नाहींच, पण उलट तेथें अशी एक सुधारणा झाली, कीं, पूर्वी कलावंतींचा एक मेळ (जमाव) नाचत असे, ते आतां दोन नाचूं लागले !

गोमांतकाबाहेरील वाचकांस जांबावलीच्या शिमग्याची नीट कल्पना करतां येणार नाहीं, तेव्हां त्यांच्या सोयीसाठीं त्याची थोडीशी माहिती देणें इष्ट आहे. मडगांवचा ग्रामदेव दामोदर. या देवाचें मंदिर पूर्वी मडगांवांत होतें. पण पोर्तुगेज लोकांनीं गोवें काबीज करून लोकांनां बाटविण्याचा सपाटा चालविल्यावर ग्रामस्थांनीं त्या देवाला तेथून उचलून त्या वेळीं संवदेकर संस्थानिकाच्या ताब्यांत असलेल्या प्रांतांतील जांबावली या गांवीं त्याची स्थापना केली. या देवाचे जे काही उत्सव आहेत, त्यांत शिमगा मुख्य आहे. मडगांवचे सारस्वत ब्राम्हण आणि वाणी हा उत्सव आपसांत वर्गणी गोळा करून करीत असतात. यासाठी मडगांवच्या आयात व्यापारावर सर्वांच्या सम्मतीनें एक लहानशी पट्टी बसवली आहे; तिचें उत्पन्न १८९७ सालच्या सुमारास दर वर्षी ७०० किंवा ८०० रुपयांच्या दरम्यान होत असे. (सध्या या पट्टीचें उत्पन्न काय आहे हें मला माहित नाहीं.) याशिवाय वर्गणीचे पैसे गोळा होत असत. शिमग्याचा खर्च म्हटला म्हणजे जांबावलीस सात दिवस लहान थोरांस फुकट जेवण मिळे. शिवाय कलावंतींचा नाच, मंडपांतील दिवे, व इतर किरकोळ खर्च. हीं सगळीं कामें मक्त्यानें दिलीं जात. तरुण मंडळी रात्रीं नाटकें करीत, व दिवसा कांहीं बीभत्स सोंगे करून प्रेक्षकांना रंजवीत असत. संध्यासमयीं कलावंतिणींचा नाच सुरू होऊन तो रात्रीं आठनऊ वाजतां बंद होत असे. शिमगा हें देवाचें कार्य आहें असें समजणारे बरेच भाविक लोक अद्यापि आमच्या प्रांतांत सांपडतील. पण बहुतेक तरुणांवर या उत्सवाचा अत्यंत वाईट परिणाम होत असे, व अद्यापि होत आहे. दामोदराच्या मंदिराच्या ज्या अग्रशाळा आहेत त्या पांचसातशें लोकांनां पुरण्यासारख्या नाहींत. एक अग्रशाळा तर केवळ जेवण्यासाठीं राखून ठेवण्यांत येते. अर्थात् पुष्कळांनां आजूबाजूच्या कलावंतिणींच्या घरी आपलें बिर्‍हाड करावें लागतें. अशा प्रसंगीं साधारण चांगल्या माणसाची देखील नीति बिघडण्याचा संभव असतो, मग रंग लावून रंगभूमीवर नाचण्यांतच इतिकर्तव्य समजणार्‍या मठ्ठ डोक्यांच्या तरुणांची गोष्ट काय सांगावी !

पुढे वाचा