मुख्यपान » देशत्याग
A+ R A-

देशत्याग

ई-मेल प्रिंट
परिस्थितीला कंटाळून संस्कृत शिकण्याच्या उद्देशानें १८९४ सालीं मी एकदा कोल्हापुरापर्यंत प्रवास केला. कोल्हापुरास मी महालक्ष्मीच्या आवारांत उतरलों होतों. तेथें कोकणस्थ जातीचे दोन तीन विद्यार्थी रहात असत. त्यांनी मला पुष्कळ मदत केली. माझ्या जेवणाची व्यवस्था त्यांनीं खाणावळींत करून दिली. ‘आपली जेवणाची व्यवस्था काय आहे ?’ असा त्यांना प्रश्न केला असतां त्यांतील एकजण म्हणाला ‘अहो आमचे काय, देवाचा नैवेद्य मिळाला तर तेथेंच जेवतों; नाहीं तर आहेच आमची ‘ॐ भवति !’ ‘ॐ भवति’ म्हणजे काय, हे मला समजेना. तेव्हां त्याने खुलासा केला, कीं, ॐ भवति म्हणजे भिक्षा. भिक्षेस गेल्यावर ‘ॐ भवति भिक्षां देहि’ असें म्हणावें लागतें. तेंव्हा या वाक्याचा जो आरंभ ‘ॐ भवति’ त्याला आम्ही भिक्षा म्हणतों !’ माझ्या मनावर चक्क प्रकाश पडला. मुंजींत माझ्या हातीं भिक्षापांत्र देऊन आमचे पुरोहित मला ‘ॐ भवति भिक्षां देहि’ असें म्हणण्यास सांगत होते, त्याचा खरा अर्थ आज समजला. पण या ॐ भवतिवर निर्वाह करण्याचें धैर्य त्या कालीं माझ्या अंगी नव्हतें. वृद्ध वडिलांचीहि फार फार आठवण होऊं लागली. तेव्हां मी माझ्या जवळची पैशांची पुंजी संपण्यापूर्वीच कोल्हापूर सोडून मडगांवला आलों. आठ दहा दिवस माझा समाचार समजला नाहीं म्हणून वडीलहि मडगांवास आले होते. त्यांच्या पायांवर डोकें ठेवून मीं त्यांची क्षमा मागितली. ते म्हणाले “तूं जर पुनः घर सोडून गेलास, तर तुझ्या शोधार्थ मलाहि घर सोडून जावें लागेल, याचा विचार करून वाटेल तें कर.” मला फार वाईट वाटलें, व तेव्हांपासून मीं परदेशगमन करण्याचा नाद सोडून दिला.

१८९६ सालीं हिदुस्थानांत चांगला पाऊस पडला नाहीं; गोव्यांतहि या सालीं पावसाची हाकाहाक होती. नाचणी वगैरे धान्यें न पिकल्यामुळें गरीब लोकांचे फार हाल झाले. आम्हाला या दुष्काळामुळें फारसा त्रास पोंचला नाहीं. पण १८९७ सालीं जेव्हां पाऊस पडला तेव्हां गांवांत एक प्रकारचा आमांशाचा विकार सुरू झाला. ऑगस्ट महिन्यांत दोघे तिघे खेरीज करून आमच्या घरांत सर्व मंडळी आजारी पडली. मला कांहीं आजार झाला नाहीं; पण इतरांचें दुखणें काढतां काढतां पुरे वाट होऊन गेली. माझी भावजई आधींच आजारी होती. तिला हा आजार फार झोंबला, व शेवटीं अतिशय अशक्त होऊन १८९७ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या तारखेस तिचा अंत झाला. कोणी आप्त वारला असतां लोक शोक करतात, याचें मला फार आश्चर्य वाटे. मरण हें जर सर्वसाधारण आहे, तर त्याबद्दल ताप करून कां घ्यावा, असें मी माझ्या मनाशीं म्हणत असें. पण जेव्हां माझ्या भावजईवर हा प्रसंग आला, तेव्हां माझी गाळण उडून गेली. तिचीं लहान लहान मुलें रडावयाला लागलीं, तेव्हां तर माझा शोक मलाच आवरेना. तात्पर्य, ‘ परदुःख शीतल ’ म्हणतात याचा त्या प्रसंगीं मला अनुभव आला. माझ्यावर येणार्‍या भावी संकटपरंपरेला येथेंच आरंभ झाला.

पुढे वाचा