मुख्यपान » रोजनिशी आणि टिपणें.
A+ R A-

रोजनिशी आणि टिपणे

ई-मेल प्रिंट
“ हालवून खुंट । आधीं करावा बळकट ।।
मग तयाच्या आधारें । करणें तें अवघें बरें ।।”


- तुकाराम

ता. २३ जून १८९५ या दिवसापासून मीं रोजनिशी एका जुन्या वहीवर लिहिली आहे. याच वहीवर १८९८-१८९९ सालचीं कांहीं टिपणें आहेत. सात वर्षांनी परत घरीं आल्यावर ही वही जुन्या कागदपत्रांत पडलेली मला सांपडली. सध्या मागल्या कांहीं गोष्टी लिहितांना तिची मला फार उपयोग होत आहे. १८९६ सालची रोजनिशी कोठें हरवली तें समजत नाहीं. गोवें सोडून पुण्यास आल्यावर निराळीं टिपणें लिहीत असें. त्या टिपणांची वही १९०४ सालीं मोहर करून कलकत्त्याच्या महाबोधिसभेच्या सेक्रेटरीच्या स्वाधीन केलीं होतीं. पण पुढें महाबोधिसभेचीं सर्व पुस्तकें काशीजवळ सारनाथ या ठिकाणीं नेण्यांत आलीं. तेथें कित्येक पुस्तकें वाळवीनें खाल्ली, व कित्येकांची अफरातफर झाली. या घडामोडीत माझी टिपणांची वही गहाळ झाली, ती अद्यापि माझ्या हातीं आली नाहीं. पुष्कळ तपास केला, पण पत्ता लागला नाहीं. ही वही जर माझ्याजवळ असती, तर आज पुढील आत्मवृत्त लिहिणें फार झालें असतें.

सध्या शिल्लक राहिलेल्या जुन्या वहींतील माझी समग्र रोजनिशी किंवा लांबलांब टिपणें देऊन वाचकांस कंटाळा आणण्याची माझी इच्छा नाहीं. पण गोवें सोडून पुण्यास येण्यापूंर्वी माझ्या विचारांची दिशा कोणती होती, हें माझ्याशी ज्यांचा निकट सबंध नाहीं अशा वाचकांस ठाऊक असणें अत्यंत इष्ट आहे. मी वैतागून घर सोडून निघालों, व केवल दैवबलानें पुढें आलों, अशी कित्येकांची समजूत आहे. दुसर्‍या कित्येकांनां, गोवें सोडल्यावर माझी धार्मिक आणि सामाजिक मतें बदलली असें वाटतें. या व दुसर्‍या कांहीं गैरसमजुती नष्ट करण्यासाठीं माझ्या टिपणांतील एक दोन उतारे येथें देतों.

( मुलांस उपदेश )१


१. हा उपदेश मी माझ्या पुतण्यांना उद्देशून लिहिला होता. नि.३

सांकवाळ ता. २२ मे १८९८ ज्येष्ठ शु.२ या, रविवार.

मुलांनों, तुम्हांस माझ्यामागें कांहीं रहावें असा माझा उद्देश आहे. तुम्हांस ठेवावयास माझ्यापाशीं संपत्ति तर नाहींच. तेव्हां या जगांतील अत्यल्प अनुभव तुम्हांकरितां टिपून ठेवतों. त्याचा तुम्हीं चांगला उपयोग करावा, असा माझा हेतु आहे. ही वही कालचक्राच्या फेर्‍यांतून टिकल्यास तुमच्या प्रौढपणीं तुम्हांस सापडेल. तेव्हां मीं लिहिलेलें टिपण व इतर विषय तुम्हीं वाचून पाहावे. त्यांत तुम्हांस कित्येक ठिकाणीं संसारोपयोगी गोष्टी दिसून येतील.

पुढे वाचा