मुख्यपान » पुण्यपत्तननिवास
A+ R A-

पुण्यपत्तननिवास

ई-मेल प्रिंट
“ सज्जनकलह बरा परि दुर्जनजनसंगती कधीं न करा ।”

मडगांवाहून निघालों तेव्हां निराशेच्या काळ्याकुट्ट ढगांनीं माझें अंतःकरण व्यापून गेलें होतें. दूधसागरासारख्या रमणीय स्थानाच्या दर्शनानेंहि माझें औदासीन्य नष्ट झालें नाहीं. आगगाडी मंदपणें चालली होती, आसपासचें हिरवेगार पर्वत माझ्या अवलोकनांत येत होते. पण हे पर्वत व त्यांच्या खालचा दृष्टीच्या आटोक्यांत येणारा सर्व प्रदेश माझ्याकडे उदासीनपणें पाहत आहे. असा मला भास झाला. मी माझ्याशींच म्हणालों “ माते जन्मभूमि ! बहुतेक आप्तमित्रांनीं टाकून दिलेला तुझा हा बालक आहे. माझ्या आप्तांनीं जरी मला थारा दिला नाहीं तरी तूं कोठें तरी कोनाकोंपर्‍यांत मला थारा दिल्यावांचून राहणार नाहींस. पण माते, माझ्यासारख्या हतभागी बालकानें तुझ्याशीं थारा तरी कां मागावा ? अनेक वेळीं मी माझ्या उन्नतीसाठीं तुला सोडून दूर गेलों; पण माते, माझे मनोरथ सिद्धीस न जातां काळें तोंड घेऊन तुझाच आश्रय करणें मला भाग पडलें. आतां जर यश आलें नाहीं, तर तुला तोंड दाखविणार नाहीं. असा मीं निश्चय केला आहे. माते ! तुझ्यावर माझें अतोनात प्रेम आहे. ‘ सर्वसहा ’ या नांवाप्रमाणें तूंहि माझे सर्व अपराध पोटीं घालशील अशी माझी खात्री आहे. पण मला जर यश आलें नाहीं, तर मी तुझ्या दर्शनास पुनः येणार नाहीं असें कर. हा माझा निश्चय ढळूं देऊं नकोस.”

ता. ३ डिसेंबर १८९९ या दिवशीं पहाटेस चार वाजण्याच्या सुमारास आगगाडी पुण्याच्या स्टेशनावर पोंचली. एका भाड्याच्या टांग्यानें मी रास्त्यांच्या पेठेंत गेलों. तेथें बराच वेळ शोध केल्यावर श्रीयुत अनंत रामकृष्ण रेडकर यांचें घर सांपडलें. त्यांनीं माझें स्वागत चांगलें केलें. दुसर्‍या कीं तिसर्‍या दिवशीं ते मला घेऊन त्यांच्याच शेजारी राहणारे श्रीयुत नारायणराव वर्दे यांच्या घरीं गेले. रेडकरांनीं नारायणरावांनां, मी गोव्याहून आलों आहें, इत्यादि वर्तमान निवेदन केलें. तेव्हां नारायणराव म्हणाले “ या पेज खाणार्‍या गोवेंबाबूस तुम्ही येथें कशास आणलें ?  पुण्यात याचा काय उपयोग ?” इतकें बोलून झाल्यावर नारायणराव मजकडे वळून म्हणाले “ माझ्या बोलण्याचा राग मानूं नका हो; तें थट्टेचें बोलणें आहे !” मी म्हणालों, “ मला राग येण्याचें मुळींच कारण नाहीं. जिवबादादा बक्षी, लखबादादा लाड, वगैरे मंडळी पेज खाणारीच होती. तुम्हांला कदाचित् पुणेकरांच्या सहवासानें या मंडळींचा विसर पडला असेल, व त्यायोगें पेजेचाहि तुम्हांला कंटाळा आला असेल !” हें उत्तर मिळाल्यावर नारायणराव चूप बसले. पुढें एकदोनदां मी त्यांच्या घरीं गेलों असतां त्यांच्या मुलांनीं तुमचें नांव सांगा असें म्हणावें, व मी ‘ पेज जेवणारे गोवेंबाबू आले आहेत हें नारायणरावांस कळवा ’  असें त्यांना सांगावें. मुलांनीं हेच शब्द नारायणरावांसमोर उच्चारावे. शेवटीं एके दिवशीं ते म्हणाले “ मेहरबानी करून हे शब्द उच्चारू नका. यांच्या योगें तुम्हीं माझा जणूं काय सूड घेत आहांत. तुम्हांला पेज खाणारे म्हटल्याबद्दल वाईट वाटले असल्यांस मी तुमची क्षमा मागतों !”

पुढे वाचा