मुख्यपान » पुण्याहून ग्वाल्हेरपर्यंत
A+ R A-

पुण्याहून ग्वाल्हेरपर्यंत

ई-मेल प्रिंट
मीं ज्या दिवशीं पुणें सोडलें त्या दिवशीं अमावास्या होती, हें मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे. धोंड मनमाडकडे जाणारी गाडी गांठण्यासाठीं रात्री बारा वाजण्याच्या सुमारास प्रार्थनासमाज सोडून मी स्टेशनावर जाण्यास निघालों. माझ्या अंतःकरणांत जिकडे तिकडे निराशेचा गाढ अंधकार पसरला होता. पण आकाश निरभ्र असल्यामुळें या दिवशीं चमकणार्‍या तार्‍यांप्रमाणें मधुनमधून एखादा आशाजनक विचार चमकत नव्हता असें नाहीं. मी हें भयंकर धाडस करींत आहें याची जाणीव मला होती. आणि यांत यश येणें फार कठिण, हेंहि पण मी जाणून होतों. तथापि दृढनिश्चयानें उद्योग केल्यास याच जन्मीं बौद्ध धर्माचें अल्पस्वल्प ज्ञान संपादतां येईल असेंहि वाटे. कांहीं असो, मीं जें धाडस करीत आहें तें केवळ स्वार्थासाठीं नव्हे- चोरदरोडेखोरांच्या धाडसासारखें तें नव्हे, या विचारानें माझ्या मनाला बरेंच समाधान वाटलें. या प्रयत्‍नांत यश न येतां मरण आलें तरी हरकत नाहीं; जें कांहीं करण्यासारखें होतें तें मीं केलें- माझें कर्तव्य मीं बजावलें असें मला म्हणतां येईल, व त्यायोगें मरणकालीं मला एक प्रकारची शांतिच प्राप्त होईल, असेंहि मला वाटूं लागलें.

धोंडच्या पुढें गेल्यावर आगगाडींत इंदुरास जाणारे कांहीं विद्यार्थी भेटलें व त्यांनीं इंदुरपर्यंत मला सांभाळून नेलें. ते इंदुरास खाणावळींत उतरले होते, तेथेच मीहि उतरलों. माझ्याजवळची सर्व पुंजी एकदोन दिवसांत संपून गेली. आतां भिक्षेचा प्रसंग साक्षात् उभा राहिला. पण अशा अपरिचित प्रदेशांत भिक्षा देतो कोण ? एक दोन ठिकाणीं याचना केली, पण लभ्यांश कांहीं झाला नाही. शेवटीं वागळे आडनांवाचे कोणीएक बडे अधिकारी येथें राहात असत, त्यांजपाशी गेलों. सकाळची वेळ होती. स्वारी अंगांत एक कापसाची बंडी घालून आपल्या दिवाणखान्यांत हुक्क्याचे झुरके मारीत बसली होती. गुडगुडीचा मला परिचय होताच. पण हुक्कायंत्र पाहण्याची संधि आजवर आली नव्हती. तेव्हां त्याची ती प्याल्याएवढी चिलीम, ती सापासारखी वेंटाळीं घेत जमिनीवर पसरलेली लांबलचक नळी, तो रुपेरी बेला इत्यादि सामुग्री पाहून माझें मन क्षणभर विस्मित झालें, यांत नवल नाहीं. पण फार वेळ या यंत्राच्या रचनेच्या शोधात न घालवितां रावसाहेबांपुढें मी हात पसरला. रावसाहेब एकतर हुक्क्याच्या कामांत होतेच. त्यांत त्यांच्या आफिसचें काम घेऊन एक कारकून आला. मग त्यांनां माझ्याशीं बोलावयाला सवड नव्हती, हें निराळें सांगणें नको. त्यांनीं दुसर्‍या एका कारकुनाला हाक मारून चार आण्यांचे पैसे मला द्यावयास सांगितलें. हें चार आणे होळकरशाई होते की इंग्रजी होते, याची आतां आठवण नाहीं. रावसाहेबांनीं प्रश्न वगैरे न विचारतां चार आण्यांचे पैसे दिले, याचा मला एक प्रकारे आनंद झाला. कारण, तुम्हीं आलां कोठून, जाता कोठें, जात काय, लग्न झालें आहे कीं नाहीं, इत्यादि अनिच्छित प्रश्नांचीं उत्तरे देण्याचा प्रसंग टळला !

पुढे वाचा