मुख्यपान » काशीयात्रा
A+ R A-

काशीयात्रा

ई-मेल प्रिंट
ग्वाल्हेरीहून निघालों तों दुसर्‍या दिवशीं प्रयागाला येऊन पोहोंचलों. तेथें दाक्षिणात्य पुरोहिताकडे उतरलों. हे भटजी चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनीं सर्व तीर्थयात्रा सव्वा रुपयांत आटपण्याचें कबूल केलें. मुख्य विधि क्षौराचा होता. दुसर्‍या दिवशीं भटजींबरोबर मी संगमावर गेलों. भटजींनीं न्हाव्याची गांठ घालून मला क्षौर करावयास सांगितलें. सहा महिने ग्वाल्हेरीस राहिल्यामुळें मला थोडीशी हिंदुस्तानी भाषा बोलतां येत होती. न्हाव्याला मीं या भाषेंत डोक्याच्या मध्यभागीं सुमारें चार पांच इंच व्यासाची शेंडी ठेवण्याबद्दल बजावून सांगितलें. परंतु शेंडीला हिंदी भाषेंत निराळेंच नांव असल्यामुळें त्याला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला नाहीं. त्यानें आपल्या स्वदेशी वस्तर्‍यानें डोक्याच्या मध्यभागापासून एक दोन पाट काढलेच. इतक्यांत मला शंका आल्यामुळें त्याला पुनः विचारलें. तेव्हां तो म्हणाला ‘ बस ठीक है !’ पण त्याच्या या कृत्यामुळें शेंडी ठेवणें अशक्य झालें. शेवटीं सरासरी अर्धा इंच व्यासाची, आणि तीहि तंतोतंत मध्याला नव्हे, अशी शेंडी ठेवून या कुशल नाभितानें आपलें काम पुरें केलें ! पिंड वगैरे क्षेत्रकृत्यांच्या भानगडींत मी मुळींच पडलों नाहीं. भटजींला सव्वा रुपया दिल्यामुळें सर्व गोष्टी परस्पर त्यांनींच पाहून घेतल्या.

ता. २० सप्टेंबर १९०० रोजीं दुपारच्या गाडीनें प्रयागाहून (अलाहाबादहून) निघून रात्रीं साडेदहा वाजतां काशी स्टेशनावर पोंचलों. कोणी एक सखाराम भट नांवाचे कोकणस्थ ब्राम्हण उतरल्याबरोबर मला म्हणाले, की, “ आपल्या येथें चला, मी आपली सर्व कांहीं सोय लीवून देतों.” इतक्यांत दुसरे एक कृष्णवर्ण किंचित् ठेंगणे असे सखारामभटजी तेथें आले. ते म्हणाले, “ तुमचे वाडवडील येथें आले तेव्हां आमच्या घरी उतरले होते. आतां तुम्ही या भामट्याच्या नादीं काय म्हणून लागतां ?” तेव्हां या काळ्या आणि पूर्वीच्या गोर्‍या सखाराम भटांची जी तोंडातोंडी झाली, ती कांहीं पुसण्याची सोय नाहीं. दोघांचीहि समजूत घालण्याचा मी प्रयत्‍न केला. मी म्हणालो, “ भांडतां कशाला ? आमच्या पूर्वजांचा लेख ज्याच्याकडे असेल तो त्यानें आणून दाखवावा. म्हणजे उद्या मी त्याच्याकडेस जाईन. सध्या ज्या अर्थी (गोरे) सखारामभटजी मला प्रथमतः भेटले, तेव्हां मी त्यांच्याच येथें उतरतों.” एवढे बोलणें झाल्यावर गोर्‍या सखारामभटजीबरोबर मी स्टेशनाच्या बाहेर पडलों. तेव्हां काळे सखारामभटजी मोठ्यानें ओरडून म्हणाले, “ जा जा त्याच्याच बरोबर जा. हा भामटा तुमच्या जवळचें सर्व कांहीं काढून घेऊन तुमचा खून करील, सांभाळा !” मी म्हणालों , “ माझ्याजवळ काढून घेण्यासारखे कांही नाहीं; आणि माझा खून होईल याची मला मुळींच भीति नाहीं.” त्या रात्रीं स्टेशनाजवळच एका लहानशा खोलींत मी व गोरे सखारामभटजी निजलों. आणखीहि दोन तीन मंडळी तेथें होती. परंतु माझ्या मनांत खुनाची शंका देखील आली नाहीं. मला गाढ झोंप लागली.

पुढे वाचा