मुख्यपान » काशीवास
A+ R A-

काशीवास

ई-मेल प्रिंट
काशीमध्यें लहानमोठीं पुष्कळ अन्नछत्रें आहेत.  त्यांत मुक्तद्वार अशीं दोनच आहेत.  एक मद्रासकडील व्यापार्‍यांनीं स्थापन केलेलें, व दुसरें श्रीमंत महाराज जयाजीराव शिंदे यांनीं स्थापन केलेलें.  श्री. जयाजीराव शिंदे काशीस गेले त्या वेळीं त्यांच्या मनांतून काशीनिवासी प्रत्येक कुटुंबवत्सल ब्राह्मणास शंभर रुपये दक्षिणा द्यावी असें होतें.  पण काशींतील पंडितांस ही गोष्ट रुचली नाही.  एखाद्या दशग्रंथी वैदिकास किंवा षट्शास्त्री पंडितास व एखाद्या निरक्षर ब्राह्मणास सारखीच दक्षिणा मिळणें पंडितमंडळींस पसंत नव्हतें.  तेव्हां श्री. जयाजीराव रागावून म्हणाले, कीं, ''ही गोष्ट सर्वसंमत नसेल तर, दक्षिणेसाठीं निराळे काढलेले हे सहा लक्ष रुपये आम्ही गंगेंत बुडवून टाकतों !''  या प्रसंगीं कांहीं विचारी गृहस्थांनी मध्यस्थी करून श्री. जयाजीरावांनां अशी सल्ला दिली, कीं, हे रुपये गंगेंत न बुडवितां याच खर्चानें येथें एक छत्र स्थापावें.  श्री. जयाजीरावांनीं ही गोष्ट कबूल करून पेशव्यांनीं बांधलेलें बालाजीचें मंदिर इंग्रजसरकारच्या ताब्यांतून आपल्या ताब्यांत घेतलें, व तेथें हें अन्नछत्र सुरु केलें.  याला सध्या 'बालाजीचें अन्नछत्र' म्हणतात.

बालाजीच्या अन्नछत्रांत सारस्वतांनां घेतात, पण त्यांस वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्यांतहि ही परवानगी मिळाली तरी सारस्वतांनां दुसर्‍या पंक्तीच्या वेळीं जेवूं घालतात.  दुसरा इलाज नसल्यामुळें याच अन्नछत्रांत जाणें मला भाग होतें.  म्हणून गोविंदराव पालेकरांनीं मला ग्वाल्हेरीहून येथील अधिकार्‍याला पत्रें आणून येथेंच जेवणाची व्यवस्था करण्याबद्दल सांगितलें.  डॉ. वागळे यांस यासंबंधानें लिहिलें.  परंतु त्यांनीं स्वतः कांहींच न लिहितां श्रीयुत मालप यांजकडून पत्र लिहविलें.  मालपांचें म्हणणें असें होतें, कीं, बालाजीच्या अन्नछत्रांत जाण्याचें कारण नाहीं; डॉ. वागळे हे रावराजे रघुनाथराव राजवाडे यांस सांगून त्यांच्या अन्नछत्रांत माझी सोय करणार आहेत.  रावराजे रघुनाथराव यांचे वडील दिनकरराव यांनी ब्रह्मघाटावर कोठेंसें एक पंधरा ब्राह्मणांचें छत्र ठेविलें आहे.  तेथे माझी व्यवस्था झाली असती, तर माझे पुष्कळ हाल वांचले असते.  पण डॉ. वागळ्यांचा स्वभाव पडला भिडस्त; त्यांनीं रावराजे यांस विचारलें नाहींच, पण त्यांच्या एका चिठीनें बालाजीच्या अन्नछत्रांत सोय झाली असती, ती देखील त्यांनीं केली नाहीं.  मी इकडे डॉ. वागळ्यांना पत्राची व्यर्थ वाट पाहत राहिलों.

पुढे वाचा