मुख्यपान » नेपाळचा प्रवास
A+ R A-

नेपाळचा प्रवास

ई-मेल प्रिंट
ता. २ फेब्रुवारी १९०२ या दिवशीं दुर्गानाथ, त्याचा एक सोबती व मी काशीहून निघालों. दुसर्‍या दिवशीं आम्हीं रकसौल स्टेशनावर पोचलों.  हें स्टेशन नेपाळ सरहद्दीच्या अगदीं जवळ आहे. येथून बीरगंज हें नेपाळी ठाणें अवघें दोन मैल आहे. स्टेशनाजवळच आम्ही एक ठिकाणीं रात्रीं मुक्काम केला. हें दोन दिवस मीं फराळावरच काढले. दुसर्‍या दिवशीं पहांटेस आम्ही नेपाळची सरहद्द ओलांडली. माधवाचार्यांनीं दिलेला एक जुना दक्षिणी जोडा माझ्या पायांत होता, तो पार फाटून गेला, म्हणून वाटेंत फेकून देण्यासाठीं काढला असतां सगळा उजवा पाय रक्तानें माखलेला ! अंधारांत जोडा लागून पायांतून रक्त निघालें व तें तेथल्यातेथें गोठून गेलें, हें अतिशय थंडीमुळें मला समजलें देखील नाहीं. लोक उठण्यापूर्वीच आम्ही बीरगंजला पोंचलों.

येथून पुढील प्रवासाची सविस्तर माहिती ज्या पुस्तकांत लिहून ठेवली होती, तें हरवलें हें मीं मागें सांगितलेंच आहे; तेव्हां आतां मला केवळ माझ्या स्मरणशक्तीवर अवलंबून रहावें लागत आहे. सगळ्या मुक्कामांचीं नांवें देखील मला आठवत नाहींत. दुपारीं बीरगंज येथें जेवण करून आम्ही निघालों. मीं माझे डंबेल्स बरोबर आणिले होते, ते तेथें व एका दुकानदारापाशीं ठेवलें. बाकी माधवाचार्यांनीं मला जुनी कांबळ दिली होती ती, माझ्या दोन कांबळी, व कांहीं पुस्तकें एवढें सामान मजबरोबर होतें. मजूर कोणीं न मिळाल्यामुळें हें सर्व सामान मलाच घ्यावें लागलें. पण दोन तीन मैल चालत गेल्यावर मी अगदींच थकून गेलों. तीन दिवस पोटांत पुरेसें अन्न नव्हतें, व त्यावर एवढें ओझें घेऊन तीन मैल चालत जाणें माझ्यासारख्या अशक्त माणसाला शक्यच नव्हतें. किती तरी वेळां येथूनच मागें फिरण्याचा विचार माझ्या मनांत आला. पण नेपाळास गेलों नाहीं तर बौद्धधर्माचें ज्ञान कसें मिळणार हा विचार मागें फिरण्याच्या विचारावर जय मिळवीत असे. शेवटीं वाटेंत आम्हाला एक मुसलमान गडी भेटला, त्यानें भीमफेदीपर्यंत दीड रुपयांत येण्याचें कबलू करून सामानाचा बोजा आपल्या शिरावर घेतला. पहिला मुक्काम आम्ही बीरगंजाहून पांच मैलांवर एक गांव (या गांवाचें नांव आतां आठवत नाहीं.) आहे तेथें केला. येथें मीं पोहे आणि गूळ खाऊनच रात्र काढिली. दुसर्‍या दिवशीं म्हणजे बुधवारीं आम्ही सरासरी दहामैल चालत गेलों. येथून नेपाळची तराई संपून हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या जंगलात सुरवात झाली.

नेपाळचे पहाडी मुलूख व तराई असे दोन भाग करितात. तराई हा मुलूख नेपाळाला इंग्रज सरकाराकडून मिळाला आहे. तराईंतील रयत हिंदी आहे. सरकारी अधिकारी मात्र नेपाळी असतात. बीरगंज येथें एक बडा नेपाळी अधिकारी असतो. या तराईचें उत्पन्न नेपाळ सरकारास पहाडी मुलखापेक्षां जास्त येत असावें. येथें भाताचें पीक फार येत असतें. कानपुरी तांदुळ म्हणतात तो याच प्रांतांतून येत असावा. हा प्रांत सुपीक खरा, पण येथें मलेरिया तापाची फार भीति असल्यामुळें नेपाळी लोक या प्रांतांत राहण्यास फार घाबरतात. दुर्गानाथाला तर ही तराई ओलांडून नेपाळचे उंच डोंगर कधीं पाहीन असें झालें होतें. तो बाणासारखा धांवत सुटे. मी मागाहून हळुहळू चालें. त्याच्या आजोबानें पाठविलेले दोन गडी त्याला बीरगंज येथें भेटले. ते माझी विपत्ति पाहून खरखदां हांसत. मला त्यांच्या क्रौर्याचा अचंबा वाटला. माझा मुसलमान गडी मात्र माझी कींव करी. गुरुवारीं दुपारीं आम्हीं एका ओढ्याच्या कांठीं स्वयंपाक केला. दुर्गानाथानें मला एक लहानशी लोखंडी कढई दिली. वारा सोसाट्याचा वाहत होता, तेव्हां या कढईंत मी केलेला भात एका ठिकाणीं मऊ झाला, तर दुसर्‍या ठिकाणीं तांदुळच राहिले ! त्या दिवसापासून दिवसांतून एकदां दुर्गानाथच मला आपल्याबरोबर जेवावयास घालूं लागला.

पुढे वाचा