मुख्यपान » नेपाळपासून सिलोनपर्यंत
A+ R A-

नेपाळपासून सिलोनपर्यंत

ई-मेल प्रिंट
कटमंडूपासून रकसौलपर्यंत कावडकरांची मला फारच मदत झाली. दुर्गानाथाप्रमाणें ते लांबलांबचा मुक्काम करीत नसत. मी थकलों असें त्यांना दिसून आल्याबरोबर त्यांनीं मुक्काम करावा, माझ्या जेवणाची त्यांनीं प्रथम व्यवस्था करावी, व मला थंडीची बाधा होऊं नये म्हणून निवार्‍याची जागा पहावी नेपाळास जातेवेळीं बीरगंज येथें मी माझे पांच पौंडांचे डंबेल्स एका एका नेपाळी दुकानदाराजवळ ठेवून गेलों होतों, ते परत येतांना घेतले. कावडवाले बरोबर असल्यामुळें सामानाचा बोजा मजवर मुळींच पडला नाहीं. रकसौलला पोंचल्यावर कावडकरांनां मी माझ्या दोन कांबळी, एकतांब्या इत्यादि सामान देऊन मोकळा झालों. आतां एक कांबळ, एक कोट, कांहीं पुस्तकें, दोन धोतरें, एक फेटा, एक तांब्या, दोन खादीच्या बंड्या व एक डंबेल्सची जोडी येवढें सामान मजजवळ शिल्लक राहिले.

रकसौलहून दोन कीं सव्वादोन रुपये खर्चून मीं बांकीपुरचें तिकीट काढलें, व दुसर्‍या दिवशीं संध्याकाळीं मोकीपुरास पोंचलो. माझ्याजवळ आठ बारा आणि शिल्लक होते, पण त्या दिवशीं रात्रीं मीं फराळ केला कीं नाहीं याचें आतां मला स्मरण नाहीं. बहुधा रात्रीं मी उपाशींच राहत असें. बांकीपुरास मी एका मठांत उतरलों. एका ओसरीवर संन्याशी, बैरागी, ब्राह्मण इत्यादि यात्रेकरूंचे बिछाने पसरले होते, त्यांतच थोडी जागा करवून तेथील मुख्य संन्याशानें माझी सोय केली. माझ्या शेजारींच एक दाढीवाला बैरागी होता. त्याला माझ्या आगमनानें संताप आला असावा. माझ्यावर त्यानें आपल्या कठोर वाग्बाणांचें संधान धरलें. मला त्याच्या बोलण्याचें कारण काय तें समजेना. शेवटीं मीं त्याला सांगितलें. कीं, मी एक रात्रीपुरता येथें राहणार आहें, येवढ्या वेळेंत आपली कांहीं गैरसोय झाल्यास क्षमा असावी. हें ऐकून या योग्याचा (जोग्याचा) राग शांत झाला. जी काय गैरसोय होईल ती एका रात्रीपुरतीच होईल असें वाटून त्याचें समाधान झालें असावें !

बांकीपुराहून गयेस जाणारी गाडी सकाळीं सातआठच्या दरम्यान निघत असे. गाडीचें भाडें बारा आणे; पण येवढे पैसे मजपाशीं नव्हते. मी उतरलों होतों त्या मठाशेजारींच एक मंगळप्रसाद नांवाचे सुशिक्षित कायस्थ राहत होते. माझी डंबेल्सची जोडी घेऊन मी त्यांजपाशीं गेलों आणि ती विकत घेण्यास त्यांनां विनंती केली. त्यांनां ती नको होती; पण माझ्या आग्रहास्तव त्यांनीं ती बारा आण्यांस विकत घेतली. (ही जोडी मी काशीस असतांना एक रुपया दोन आण्यांस घेतली होती.) बारा आणे मिळाल्याबरोबर मीं ताबडतोब स्टेशनावर जाऊन गयेस जाणारी सकाळची गाडी साधली. गाडींत एका त्रिपुण्ड्रधारी पंडिताची गांठ पडली. मी गयेस जाणार आहें, असें त्याला समजल्यावर तो म्हणाला, ''आहो, गया म्हणजे बकाली शहर ! तेथें तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची दाद लागणें फार कठीण. तेथें तुम्हांला नुसतें दारांत देखील उभें राहूं देणार नाहींत. तथापि मी माझ्या एका मित्राचा तुम्हांला पत्ता सांगतों. तो वैद्यकीचा धंदा करतो. तो गयावळांसारखा नाहीं. माझें नांव सांगितलें असतां तो तुम्हांला आपल्या घरीं राहण्यास जागा देईल.'' पंडितजीनें सांगितलेल्या ब्राह्मण वैद्याचा पत्ता, व पंडितजीचें नांव मीं टिपून घेतलें. पण पंडितजींची गयेवरील टीका मला यथार्थ वाटली नाहीं. माझ्यासारख्या विद्यार्थ्यास उतरण्यापुरती जागा गयेसारख्या क्षेत्रांत मिळणार नाहीं हें संभवेल तरी कसें ? पंडितजीच्या नांवाचा किंवा त्याच्या मित्राच्या पत्त्याचा उपयोग करावा लागेल असे मला वाटलें नाहीं. केवळ भिडेखातर त्याचें नांव व त्यांच्या मित्राचा पत्ता मीं संग्रहीं ठेवला. पंडितजी मधल्या एका स्टेशनावर उतरले. मी दुपारीं अकरा वाजण्याच्या सुमारास गयेस पोचलों.

पुढे वाचा