मुख्यपान » विद्योदय विद्यालय
A+ R A-

विद्योदय विद्यालय

ई-मेल प्रिंट
इ.सन १५०५ मध्यें जेव्हां फ्रांसिस्क दी आल्मेद हा पोर्तुगीज सरदार सिंहलद्वीपाच्या किनार्‍यावर उतरला, तेव्हां त्या द्वीपाची राजसत्ता सात निरनिराळ्या राजांमध्यें वांटली गेली होती. १५१७ मध्यें गोव्याच्या गव्हर्नर जनरलनें कोट्टा येथील राजाच्या परवानगीनें कोलंबो येथें एक किल्ला बांधला. त्या वेळेपासून पोर्तुगिजांनीं हळुहळू एक एक पाऊन पुढें टाकून पंचवीसतीस वर्षांत समुद्रकिनार्‍याचा प्रदेश आपल्या ताब्यांत आणिला, पोर्तुगीज लोक मुसलमानांप्रमाणेंच धर्मवेडे होते हें सर्वविश्रुत आहे. त्यांनीं आपली राजसत्ता कायम करण्याची खटपट न करतां रोमन क्याथोलिक धर्माचा सामोपचारानें आणि जबरदस्तीनें आपल्या ताब्यांतील मुलखांत प्रसार करण्याचा एकसारखा सपाटा चालविला. सिलोनांतील आपल्या अमलाखालच्या प्रदेशांत त्यांनीं असा एक कायदा केला होता, कीं, ज्यांचीं लग्नें क्याथोलीक धर्माप्रमाणें झालीं नसतील त्यांच्या संततीस त्यांचे कायदेशीर वारस समजण्यांत येणार नाहीं. सिंहली बौद्धांमध्यें जातिभेदाचें बंड हिंदु लोकांइतकें माजलें नसल्यामुळें या कायद्याचा परिणाम असा झाला, कीं, कित्येक गृहस्थ जरी बौद्ध धर्माला मानीत असत, तरी आपल्या संततीला वारसाचे हक्क मिळावे या उद्देशानें रोमन क्याथोलिक पाद्रींकडून ते आपला लग्नविधि करवीत, व आपलीं लग्नें चर्चच्या वहींत नोंदीत. याप्रमाणें आसपासच्या प्रदेशांत जरी रोमन क्याथोलिक पंथाचीं पाळेंमुळें खोल गेलीं नाहींत, तरी कोलंबोसारख्या पोर्तुगीज वस्तीच्या ठिकाणीं बौद्ध भिक्षूंचें दर्शन दुर्लभ होऊन गेलें.

पोर्तुगिजांच्या कारकीर्दीत सिलोनांत रोमन क्याथोलिक पंथाचा प्रसार करण्याचा सेंट फ्रांसिस्क झेवियरच्या मागोमाग ज्यांनीं जीवापाड मेहनत केली ते फादर जुजे वास, हे, मी ज्यागांवीं जन्मलों त्याच गांवीं जन्मले होते. गोव्यांत रोमन क्याथोलिक पंथाचा उत्तम अभ्यास करून धर्मप्रसारार्थ ते सिलोनला गेले. परंतु ज्या धर्माचा उच्छेद करण्यासाठीं त्यांनीं इतकी मेहनत केली, भयंकर संकटें सोसलीं, त्याच धर्माचा अभ्यास करण्यासाठीं विसाव्या शतकाच्या आरंभीं आपल्या गांवचा एक तरुण होतकरू अतोनात क्लेश सहन करून सिलोनला जाईल, हें त्या वेळीं त्यांच्या स्वप्नीं तरी आलें असेल काय ? कालचक्राची गति विलक्षण आहे. सेंट झेवियर आणि फादर जुजे वास यांसारख्या थोर पुरुषांनीं ज्या धर्माचा उच्छेद मांडला होता, त्याला अनुसरणारे भाविक लोक खुद्द यूरोप खंडांत निपजूं लागले आहेत; आणि ज्या धर्माचा प्रसार करण्यासाठीं वरील साधु पुरुषांनीं जीवापाड मेहनत केली, त्याचा इटलीसारख्या मायदेशांतच लोप होत चालला आहे ! आजला फ्रान्स आणि पोर्तुगाल या देशांत रोमन क्याथोलिक पंथाला किती महत्त्व राहिलें आहे, हें सांगण्याची तरी येथें गरज नाहीं !

इ.स. १६५८ या वर्षी पोर्तुगीज लोकांच्या ताब्यांतील सिंहलद्वीपांतील सर्व मुलूख डच लोकांच्या ताब्यांत गेला. पोर्तुगिजांसारखे डच धर्मवेडे नव्हते. क्यांडी येथील सिंहली राजाशीं इतर सरदारांशीं तह करून आपला व्यापार वाढविण्याच्या ते खटपटीतस लागले. त्यांच्या हातून कोणत्याहि ख्रिस्ती खर्मपंथाला उत्तेजन मिळालें नाहीं. तथापि कोलंबोसारख्या ठिकाणीं रोमनक्याथोलिकांचें वर्चस्व कायम राहिलें. इ.स. १७९५ या वर्षी डचांचा आणि इंग्रजांचा युरोपमध्यें बेबनाव झाला. त्याचा परिणाम असा झाला, कीं, इंग्रजांनीं डचांच्या सिंहली मुलखावर स्वारी करून तो सर्व इ.स. १७९६ सालीं काबीज केला. पुढें क्यांडी येथील श्रीविक्रमराजसिंह राजाचें आणि इंग्रजांचें वांकडे आलें. १८०३ सालीं इंग्रजांनीं क्यांडीवर स्वारी केली; परंतु डोंगराळ प्रदेशांतून चाल करून जावें लागल्यामुळें त्यांच्या सैन्याचें अतोनात नुकसान झालें, व या स्वारींत त्यांनां जय मिळाला नाहीं. सन १८१५ सालीं एका प्रधानाचें आणि विक्रमराजसिंहाचें भांडण झालें. त्याला कांहीं कामानिमित्त दुसरीकडे पाठवून राजानें त्याच्या बायकोला आणि मुलांना ठार मारलें. विक्रमराजसिंह हा आमच्या शेवटल्या बाजीरावासारखाच मूर्ख आणि क्रूर होता. तथापि त्याला राज्यपदावर अभिषिक्त केल्यामुळें लोकांनीं त्याचीं अनेक दुष्टकर्मे सहन केलीं. परंतु त्याच्या या शेवटल्या कृत्याचा त्याच्या सरदारांनां फार राग आला. त्यांनीं त्या प्रधानामार्फत इंग्रजांशीं गुप्‍त तह केला, व १८१५ सालीं त्यांनां क्यांडीस बोलावून नेऊन आपल्या निर्दय राजाला पकडून त्याच्या हवालीं केलें. इंग्रजांनीं विक्रमराजसिंहाला मद्रास इलाख्यांत कोठेंसे नेऊन ठेवलें; व त्याचा मुलूख आपल्या राज्यास जोडिला.

पुढे वाचा