मुख्यपान » मद्रास आणि ब्रह्मदेश
A+ R A-

मद्रास आणि ब्रम्हदेश

ई-मेल प्रिंट
महावीर नांवाचा उत्तर हिंदुस्तानांत भोजपुर येथें राहणारा एक क्षत्रिय जातीचा गृहस्थ श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या पदरीं होता. याला कुस्ती वगैरे सर्व मर्दानी खेळ उत्तम येत असत, आणि म्हणूनच मल्हाररावांची याच्यावर मर्जी जडली होती. पुढें मल्हाररावांची मद्रासेस रवानगी झाल्यावर महावीरानें बडोदें सोडलें, व दुसर्‍या एका सोबत्याबरोबर फिरत फिरत तो सिलोनला आला. महावीर सिलोनला सात आठ वर्षे होता. तेथें त्याचें आणि कांहीं भिक्षूंचें सख्य जडलें, व पुढें भिक्षु होऊन तो स्वदेशीं परत गेला. कलकत्त्याला त्याची एक कुटी असे. कलकत्ता शहरी राहणार्‍या एका सिंहली गृहस्थानें या कुटींत राहणार्‍या भिक्षूंच्या खर्चासाठीं दरमहा वीस रुपये द्यावे असें आपल्या मृत्युपत्रांत लिहून ठेवलें होतें. कांहीं वर्षे ही रक्कम सरकारी तिजोरींतच पडून राहिली होती, ती एकदम त्या गृहस्थाच्या मृत्युपत्रांचा निवाडा झाल्यावर महावीर भिक्षूच्या हाती आली. भिक्षूला पैसे घेऊन काय करावयाचें अशा उद्देशानें महावीरानें या पैशांचा विनियोग बौद्धांच्या उपयोगासाठीं करण्याचा बेत केला. बुद्धगया किंवा काशी या ठिकाणीं बौद्ध यात्रेकरूंस उतरण्यासाठीं एक धर्मशाळा बांधावी असा त्याचा विचार होता. पण त्या दोन ठिकाणीं जेथें बौद्धांचीं स्थानें आहेत त्यांच्या आसपास त्याला जागाच मिळेना. शेवटी बुद्ध भगवान् ज्या ठिकाणीं परिनिर्वाण पावला (हें स्थान गोरखपूर जिल्ह्यांत कसया तालुक्याच्या गांवाजवळ आहे), त्याच्याजवळ त्यानें एक शेत खरेदी करून तेथें धर्मशाळा बांधण्यास सुरवात केली. महावीराला मिळालेल्या पैशांतून ही धर्मशाळा तयार होण्याजोगी नव्हती; पण कलकत्ता येथील खेजारी नांवाच्या ब्रह्मीं व्यापार्‍यानें पदरचे बारा तेरा हजार रुपये खर्च करून ही धर्मशाळा तयार केली. तेव्हांपासून महावीर भिक्षु तेथेंच राहत असे.

योगसुत्रें मीं काशीस असतांनाच वाचलीं होतीं. अशा तर्‍हेचें कांहीं योगशास्त्रविषयक पुस्तक बौद्धवाङ्‌मयांत आहे किंवा नाहीं हें जाणण्याची मला उत्कट इच्छा होती. विद्योदयविद्यालयांतील प्रियरत्‍न नांवाच्या भिक्षूनें विशुद्धिमार्गाची एक प्रत देऊन, यांत योगशास्त्राचें चांगलें विवेचन केलें आहे, असे मला सांगितले. परंतु पालिभाषेचा त्या वेळीं विशेष परिचय नसल्यामुळें तो ग्रंथ मला मुळींच समजला नाहीं. पुनः चारपांच महिन्यांनीं एक ब्रह्मी लिपींत छापलेली या ग्रंथाची प्रत माझ्या हातीं आली. केवळ ब्रह्मीलिपि शिकण्याच्या उद्देशानें मीं हा ग्रंथ वाचला. परंतु त्याची मला इतकी चटक लागली, कीं, मी त्याचे पहिले कांहीं भाग दोनदां वाचले; व त्यांतील ध्यानभावनादिक प्रकार आपण स्वतः करून पहावे अशी बळकट इच्छा उद्‍भवली. परंतु त्यांत वर्णिलेलें योग्य निवासस्थान सिलोनांत सांपडणें कठीण होतें. सिंहलद्वीपांत पुष्कळ रमणीय विहार आहेत. सृष्टिवैभवाची अनुपम शोभा पहावयाची असेल तर ती लंकेंतच सांपडेल. परंतु अशा रम्य विहारांत मी रहाण्यास गेलों असतों, तर तेथें हिंदी लोकांनां अनुकूल अन्न मिळालें नसतें, व त्या ठिकाणीं पालिभाषा बोलणारे भिक्षु दुर्मिळ असल्यामुळें बोलण्याचालण्याची मोठी पंचाईत पडली असती.

वर सांगितलेल्या महावीर भिक्षूचा धर्मदास नांवाचा एक पंजाबी शिष्य बौद्धधर्माचा अभ्यास करण्यासाठीं सिलोनला आला. सिंहली लोकांच्या जेवणाला तो पहिल्याच दिवशीं कंटाळून गेला. त्यानेंच मला महावीर भिक्षूची आणि कुशिनारा येथील धर्मशाळेची बातमी दिली. तेथें गेल्यास माझी सर्व सोय होऊन ध्यानभावनेला मला चांगला अवकाश मिळेल असें त्याचें म्हणणें होतें; आणि म्हणूनच प्रथमतः कलकत्त्याला जाऊन मग तेथें जावें, असा माझा विचार होता. परंतु माझा दैवदुर्विपाक न संपल्यामुळें अकल्पित ठिकाणीं कसें जावें लागलें, हें या प्रकरणांत सांगावयाचें आहे.

पुढे वाचा