मुख्यपान » बौद्धक्षेत्रांची यात्रा
A+ R A-

बौध्दक्षेत्रांची यात्रा

ई-मेल प्रिंट
वाईट अन्नामुळें माझ्या प्रकृतीस फार धक्का पोहोंचला. वारंवार अतिसाराचा विकार होऊं लागला. तेव्हां ब्रह्मदेश सोडून पुनः कुशिनारेला जाण्याचा प्रयत्‍न करून पहावा, असा विचार माझ्या मनांत आला. ज्ञानत्रिलोकाला माझा विचार पसंत होता; परंतु कुमार स्थविराला तो बिलकुल आवडला नाहीं. पांच वर्षे गुरूजवळ वास्तव्य केल्यावांचून दुसरीकडे आणें भिक्षूला अप्रशस्त आहे, अशी समजूत प्रचलित होऊन बसली आहे. तिला मूळ त्रिपिटक ग्रंथांत आधार अशी समजूत प्रचलित होऊन बसली आहे. तिला मूळ त्रिपिटक ग्रंथांत आधार सांपडत नाहीं. टीकाकारांनीं, शिष्य पांच वर्षे गुरूच्या विहारांत राहून अध्ययन पुरें झाल्यावर दुसरीकडे जात, असा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं केला आहे. पण या गोष्टीला देखील पुष्कळ अपवाद आहेत. मुख्य मुद्दा अध्ययनाचा आहे. विनय वगैरे ग्रंथ मला बरेच अवगत झाल्यामुळें जेथें चित्तस्वास्थ्य मिळेल तेथें राहण्यास आचार्यांकडून हरकत होऊं नये असें माझें म्हणणें होतें. परंतु 'शास्त्राद्रूढिर्बलीयसी' या न्यायाचे ब्रह्मदेशांतील बहुतेक स्थविर भक्त असल्यामुळें व आमचे गुरू त्याला अपवाद नसल्यामुळें त्यांनीं मन मोकळें करून कुशिनारेला जाण्यास परवानगी दिली नाहीं. तुला पाहिजे तर जा, असें त्यांचें म्हणणें पडलें. पण त्यांच्या मदतीशिवाय आगबोटीचें भाडें ब्रह्मी गृहस्थांकडून मिळणें अगदींच अशक्य होतें. मला संघांत दाखल करण्याचा विधि झाला त्या वेळीं मोलमीन येथील प्रसिद्ध ब्रह्मी व्यापारी मोंगश्वेहो यांनीं पुष्कळ पैसा खर्च केला; पण या वेळीं कुमार स्थविराच्या अनुमतीवांचून एक कवडी देखील ते खर्च करणार नाहींत हें मी पक्कें जाणून होतों. म्हणून तिकिटाच्या पैशासाठीं मी त्यांच्याकडे गेलों नाहीं. चिंतगांग येथील कांहीं बौद्ध व्यापारी रंगूनला रहातात. या लोकांचा आचारविचार बंगाली तर्‍हेचा आहे. केवळ धर्मानें मात्र ते बौद्ध आहेत. त्यांची आणि माझी साधारण ओळख होती. एके दिवशीं त्यांनां भेटून कुशिनारेला जाण्याचा माझा बेत कळविला. तेव्हां आगबोटीचें तिसर्‍या वर्गाचें भाडें आपण देऊं असें त्यांनीं मोठ्या आनंदानें अभिवचन दिलें.

थोडक्याच दिवसांनीं माझीं पुस्तकें वगैरे सामान बरोबर घेऊन रंगूनहून मी कलकत्त्याला आलों. कोणत्या तारखेस कलकत्त्याला पोहोंचलों याची आठवण राहिली नाहीं. तथापि १९०४ सालच्या जानुआरी महिन्याच्या आरंभींच मी कलकत्त्याला पोहोंचलों असेन असें स्मरतें. त्या वेळीं धर्मपाल जपान, अमेरिका वगैरे देशांतून प्रवार करीत होता; व त्याच्या गैरहजिरींत महाबोधिसभेचें काम अनवरत्‍न नांवाच्या एक सिंहली तरुण गृहस्थावर सोंपविण्यांत आलें होतें. हा गृहस्थ फार अव्यवस्थित होता, असें माझ्या ऐकण्यांत मागाहून आलें. परंतु त्या वेळीं त्याच्या स्वभावाची पारख होण्यास कांहीं साधन नव्हतें. मी सभागृहांत उतरलों. पण जेवणाखाणाची पंचाईत त्या दिवसापासूनच भासूं लागली. अनवरत्‍नानें माझी काळजी मुळींच लावून घेतली नाहीं. मलाहि या प्रसंगीं पूर्वीप्रमाणें माझें पुढें काय होईल, याची मुळींच पर्वा नव्हती. हिंदुस्तानी, संस्कृत आणि इंग्रजी या तीन भाषांचें व्यवहारापुरतें ज्ञान असल्यामुळें उत्तर हिंदुस्तानांत कोणत्याहि ठिकाणीं प्रवास करण्याला मी तयार होतों, व भिक्षेवर निर्वाह करण्याची माझी तयारी असल्यामुळें मार्गांत पोटापाण्याची अडचण पडणार नाहीं, अशी माझी खात्री होती; आणि यदाकदाचित् उपासमाराची पाळी आली तरी ती सहन करण्यास मी सज्ज होतों. तेव्हां कलकत्त्यांतील श्रीमंत लोकांशीं याचना करण्याच्या भरीस न पडतां दुसर्‍या कीं तिसर्‍या दिवशीं कलकत्ता सोडून पायवाटेनें मुंबईपर्यंत प्रवास करण्याचा मीं बेत केला. वाटेंत कोणी तरी तिकीट काढून दिल्यास आगगाडीनें प्रवास करावा, नाहीं तर पायीं चालावें असा विचार होता. अमुकच ठिकाणीं आणि अमक्याच दिवसांनीं पोंचावें असा निश्चय मुळींच नव्हता. जातां जातां लोकांच्या रीतिभाती आपणास समजाव्या, आणि हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या प्रांतांची माहिती व्हावी हाच हेतु होता.

पुढे वाचा