मुख्यपान » पुन:ब्रह्मदेश
A+ R A-

पुन: ब्रह्मदेश

ई-मेल प्रिंट
चंद्रमुनीनें खेजारी याला पत्र पाठवून कलकत्त्याहून ब्रह्मदेशाला जाण्याला लागणार्‍या खर्चाची आगाऊच व्यवस्था केली होती. माझ्याबरोबर बुद्धगयेला असलेला सिंहली उपासक होता असें वाटतें. तो कुसिनारेला आला होता, व तेथून त्यालाहि ब्रह्मदेशालाच जावयाचें होतें. तहशील दौरियाहून कलकत्त्याच्या तिकिटाचा खर्च महावीर भिक्षूनें देवविला. या वेळीं कलकत्त्याला मी एकदोन दिवसच होतों. तेथून रंगूनला गेलों, तेथें माझी व ज्ञानत्रिलोकाची गांठ पडली. त्यालाहि मंडालेला जाऊन कांहीं दिवस सगाईच्या डोंगरांत रहावयाचें होतें. त्याप्रमाणें आम्ही दोघेजण मंडालेला गेलों, व सगाईला जाऊन ऊ* (* ऊ हा ब्रह्मी भाषेंत बहुमानवाचक शब्द आहे. तो भिक्षूंच्या किंवा प्रसिद्ध गृहस्थांच्या नांवामागें लावतात.) राजेन्द्र याच्या विहारांत राहूं लागलों.


येथें लहानलहान झोंपड्या असून चारपांच गुहाहि खोदलेल्या होत्या. अशा तर्‍हेने विहार या डोंगरांत पन्नाससाठ तरी निघतील. मंडालेच्या, आणि सगाई गांवाच्या लोकांकडून येथील भिक्षूंनां अन्नसामग्री पोहोंचविण्यांत येते. येथें कांहीं दशशीलधारिणी संन्यासी स्त्रिया आहेत. या गृहस्थांकडून अन्नसामग्री घेऊन भिक्षूंनां शिजविलेलें अन्न देत असतात. कांहीं ठिकाणीं विहारांतच एखादा उपासक अन्न तयार करून भिक्षूंना देत असतो, व स्वतःचाहि निर्वाह करीत असतो. संन्यासी स्त्रियांचे आश्रय भिक्षूंच्या आश्रमांपासून बर्‍याच अंतरावर असतात, व तेथें अवेळी भिक्षूंनांच नव्हे तर इतर गृहस्थांनांहि जाण्याची मनाई असते. अशा एका आश्रमांत २५० पासून ३०० पर्यंत संन्यासी बाया रहातात असें सांगतात. या आश्रमाची जी मुख्य बाई होती, ती ब्रह्मदेशांतील एका प्रसिद्ध घराण्यांतील असून तिला त्रिपिटक-विशेषतः अभिधर्मपिटक उत्तम अवगत असे. या शेवटल्या ग्रंथांतील कांहीं प्रकरणें तिला नुसतीं तोंडपाठ येत असत, व त्यामुळें बौद्ध तत्त्वज्ञानासंबंधानें तिच्याशीं बोलण्यास साधारण भिक्षु फार कचरत असत.

अशा संन्यासी स्त्रियांचा एक आश्रम आमच्या विहारापासून बर्‍याच अंतरावर नदीच्या कांठीं होता. मी व ज्ञानत्रिलोक तेथें भिक्षेला जात असूं. जेवण सकाळी दहा वाजण्यांच्या आंत आटपत असे; व बाकी सारा दिवस ध्यानभावनादिक करण्यासाठीं आम्हांला सवड सांपडे. ध्यान करण्यास शिकविणारा उत्तर नांवाचा एक स्थविर या प्रदेशांत रहात होता. त्याजवळ जाऊन आम्ही ध्यानाचा मार्ग (कर्मस्थान) शिकुं लागलों. त्याला आमची भाषा समजत नसे व पालि भाषाहि त्याला धड बोलतां येत नसे. तेव्हां आमच्या शेजारच्या विहारांतून पालि भाषा जाणणारा एक तरुण भिक्षु बरोबर घेऊन आम्ही त्याजकडे जात असूं. तो जें ब्रह्मी भाषेंत बोले त्याचें भाषांतर तरुण भिक्षु पालिभाषेंत करी व मग मी ज्ञानत्रिलोकाला तो मजकूर इंग्रजींत समजावून सांगे.

प्रथमतः उत्तराचार्यानें आम्हांस 'अरहं' हा शब्द ब्रह्मी लिपींत डोळ्यांसमोर मांडून त्यावर ध्यान करण्यास सांगितलें. त्याप्रमाणें आम्ही निरनिराळ्या ठिकाणी बसून ध्यानाला सुरुवात केली. दोन दिवसांआड आमचे अनुभव आचार्याला कळवावयाचे असत. आमाच्या विहाराच्या मागल्या बाजूला एक फार उंच टेंकडी होती व त्या टेंकडीच्या मस्तकावर एक लहानशी मोडकी गुहा होती. तेथें जाऊन मी सारा दिवस ध्यान करीत असत असें. येथून खालीं इरावती नदीचें भव्य पात्र आणि त्याच्या आसपासचा प्रदेश दिसत असे. सूर्यास्ताच्या समयीं तर येथून अत्यंत सुंदर देखावा पहावयास सांपडे. ज्ञानत्रिलोक दुसर्‍या अशाच ठिकाणीं जाऊन बसत असे. परंतु त्याचें चित्त ध्यानाकडे लागेना. 'अरहं' यांतील 'अ' त्याच्या डोळ्यांसमोर नीट येई. परंतु 'र' वर पोंचतो न पोंचतो तोंच त्या 'र' ला शेंपटें फुटून त्याचे सर्प बनत असत ! आणि पुढें ध्यानाला मोठें विघ्न होई ! मला या शब्दाचें नीट ध्यान करितां येऊं लागलें. आचार्याला आमचे अनुभव सांगितले, तेव्हां त्यानें आम्हांला पुढील पायरी दाखविली, ती अशी, कीं, या शब्दावर ध्यान करतांकरतां डोळे मिटून जे देखावे डोळ्यांसमोर येतील त्यांचें नीट अवलोकन करून ते आपणाला कळवावे. माझ्या डोळ्यांसमोर प्रथमतः दोन पांढरीं कमळें व नंतर अस्ताला जाणारें सूर्यमंडळ हीं येऊं लागलीं. आचार्यानें, हे देखावे चांगले आहेत, व यांजवरच ध्यान करीत असावें, असें सांगितलें. परंतु ज्ञानत्रिलोकाचे देखावे धड त्याच्या डोळ्यांसमोर रहात नसत, व ते चांगलेहि नसत. कधींकधीं त्याला जेवणाचेच पदार्थ दिसत, तर कधींकधीं साप दिसत असत. त्या वेळीं जेवणासंबंधानें आमचे थोडेबहुत हालच होत असत; व एकंदरींत परिस्थितीमुळें त्याचें चित्त कांहींसें भ्रांत झालें होतें.

पुढे वाचा