मुख्यपान » परावर्तन
A+ R A-

परावर्तन

ई-मेल प्रिंट
गोवें सोडल्यापासून ब्रह्मदेशांतून १९०६ सालच्या जानुआरींत कलकत्त्याला येईपर्यंत जो काळ गेला तो केवळ शिक्षणांत गेला, असें म्हटलें पाहिजे. या कालांत बौद्धधर्माचें ज्ञान संपादावें हेंच काय तें ध्येय डोळ्यांसमोर होतें; पण आतां साधल्यास बौद्धधर्माच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठीं थोडीबहुत खटपट करावी अशी इच्छा उद्भूत होऊं लागली. तथापि कोणत्या मार्गानें गेलें असतां हिंदुस्तानाला माझा कांहीं उपयोग होईल, हें निश्चितपणें समजेना. कलकत्त्याला आल्यावर उमरावतीला जाऊन तेथें कांहीं वेळ रहावें, व मग साधल्यास पुण्याच्या बाजूला जाऊन कांहीं खटपट करावी, असा विचार होता. परंतु एका आकस्मिक गोष्टीमुळें माझ्या परावर्तनाला अचिंतित वळण लागलें. तें कसें, हें या प्रकरणांत सांगावयाचें आहे.

कलकत्त्याला कपाली टोल्यांतील अत्यंत गलिच्छ वस्तींत बौद्ध धर्मांकूर नांवाचा एक विहार नुकताच बांधण्यांत आला होता. तेथें बुद्धाची मूर्ति स्थापन केली होती, एवढ्यावरूनच या जागेला विहार हें नांव देण्यांत आलें असावें ! माझ्या समजुतीनें तर ही जागा विहार या संज्ञेला अगदींच अपात्र होती. अस्तु. ज्या अर्थी कलकत्त्यांत उतरण्यास दुसरी सोयीवार जागा नव्हती (कां कीं, महाबोधिसभेची भाड्याची जागा सोडली असल्यामुळें सर्व सामान काशीला नेण्यांत आलें होतें; तेव्हां तेथें उतरतां येणें शक्य नव्हतें) त्या अर्थी मी या विहारांत उतरलों. दोन दिवस विश्रांति घेऊन पुढल्या प्रवासाला लागावें, अशा बेतानें तेथें राहिलों. कृपाचरण आणि गुणालंकार नांवाचे चितगांग येथील दोन भिक्षु येथें रहात असत. त्यांचा आणि श्रीयुत हरिनाथ दे या गृहस्थांचा बराच परियच होता. पालिभाषा शिकण्यासंबंधानें याची खटपट चालली होती, आणि म्हणूनच तो मधुनमधून या विहारांत येत असे. पूर्ण नांवाचा दुसरा एक ब्रह्मी भिक्षु जवळच एका भाड्याच्या घरांत रहात असे. त्याचा व हरिनाथ देचा चांगलाच परिचय होता. हा भिक्षु सिलोनांत असतांना मला ओळखत असे, व पुढें ब्रह्मदेशांतहि मी असतांना माझ्यासंबंधी त्याला सर्व गोष्टी ऐकून माहीत होत्या.

मी एक दिवस धर्मीकुर विहारांत घालविला न घालविला तोंच कृपाचरण आणि गुणालंकार भिक्षु माझ्या जाण्यासंबंधानें उत्सुक दिसूं लागले ! मी त्यांनां सांगितलें, कीं, मला त्यांजकडून पैशांची वगैरे अपेक्षा नाहीं; केवळ विश्रांतीसाठीं एखाददुसरा दिवस मी तेथें रहाणार आहें. आणखीं कांहीं दिवस रहावें असा विचार कदाचित् झाला असता, परंतु त्यांची उत्सुकता पाहून मीं त्वरित तेथून जाण्याचा बेत केला. म्हणजे सोमवारचा दिवस राहून मंगळवारच्या गाडीनें नागपुराकडे जाणार होतों. परंतु माझा हा बेत कर्मधर्मसंयोगानें सोमवारीं पूर्ण भिक्षूला समजला. त्याच दिवशीं त्याची व माझी कलकत्त्यांत पहिल्यानें गांठ पडली असावी. त्यानें ताबडतोब जाऊन हरिनाथ देला सांगितलें, कीं, तुम्हांला पालि शिकावयाचें असेल तर सिलोन किंवा ब्रह्मदेश या ठिकाणींहि सांपडणार नाहीं असा एक मनुष्य येथें आला आहे. पण तो उद्यांच दुसरीकडे जाणार आहे.

पुढे वाचा