मुख्यपान » श्रीमंत गायकवाड महराजांचा आश्रम
A+ R A-

श्रीमंत गायकवाड महाराजांचा आश्रय

ई-मेल प्रिंट
श्रीमंत सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज, हे विद्याप्रिय राजेरजवाड्यांत अग्रणी आहेत, अशी त्यांची ख्याति पुष्कळ वर्षांपूर्वी माझ्या ऐकण्यांत आलीच होती. १९०६ सालच्या डिसेंबर महिन्यांत औद्योगिक परिषदेचे अध्यक्ष या नात्यानें त्यांचें कलकत्त्याला आगमन झालें. तेव्हां अर्थांतच त्यांच्या भेटीची मला फार इच्छा झाली. श्रीयुत सत्येंद्रनाथ टागोर आय.सी.एस., यांची व माझी नॅशनल कॉलेज सुरू झाल्यापासून चांगलीच ओळख झाली होती. त्यांत सर्वसाधारण महाराष्ट्रीय लोकांसंबंधीं त्यांच्या मनांत एक प्रकारची आदरबुद्धि वसत असे. तेव्हां मीं त्यांच्याजवळ जाऊन, 'मला बडोद्याच्या महाराजांची ओळख करून द्याल काय ?' असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले ''महाराजांपेक्षां दिवाण श्रीयुत रोमेशचंद्र दत्त यांची व माझी फार चांगली ओळख आहे, व त्यांच्याच मार्फतीनें तुमची आणि महाराजांची गांठ घालून देणें चांगलें होईल.'' त्याच दिवशीं किंवा दुसर्‍या दिवशीं ते स्वतः मला घेऊन रोमेशचंद्र दत्त यांच्या घरीं गेले. परंतु रोमेशबाबूंनीं, 'माझ्या आणि महाराजांच्या भेटीपासून कांहींएक निष्पन्न व्हावयाचें नाहीं, बौद्ध धर्मांचा बडोद्याला उपयोग नाहीं व महाराज त्यासंबंधीं, विशेष आस्था बाळगीत नाहींत,' इत्यादि उडवाउडवीचीं उत्तरें देऊन श्रीयुत टागोर यांनां व मला वाटेस लाविलें ! तेथून बाहेर पडतेवेळीं मला तर महाराजांच्या भेटीची बिलकूल आशा राहिली नाहीं. परंतु टागोर मला म्हणालो ''तुम्हांला वाईट वाटूं देऊं नका; मी स्वतः महाराज गायकवाडांनां चांगला ओळखतों, आणि उद्यां सकाळीं सातांच्या सुमारास मजकडे आलांत, तर आपण दोघेहि महाराजांच्या भेटीला जाऊं.''

त्यांच्या सांगण्याप्रमाणें दुसर्‍या दिवशीं नंबर १९ स्टोअर रोड, बालिगंज येथें त्यांच्या घरीं गेलों. आपल्या रोजच्या पोषाखानें ते तसेच बाहेर निघाले. मी त्यांच्यासाठीं गाडी आणण्यास सज्ज* (* त्यांची गाडी कांहीं कारणामुळें त्या दिवशीं मिळण्यासारखी नव्हती. ) झालों. परंतु त्यांनीं गाडींत बसणें साफ नाकारलें. सकाळीं मैल दीड मैल चालण्याची आपणाला सवय आहे, व चालल्याशिवाय चैन पडत नाहीं, असें म्हणून ते माझ्याबरोबर पायींच आले. त्या दिवशीं गायकवाड महाराज सकाळींच बाहेर कोठें गेले होते. अर्थात् आमची भेट झाली नाहीं. पण श्रीमंतांचे प्रायव्हेट सेक्रेटरी श्रीयुत (आतां सर) मनुभाई मेथा यांस माझ्यासंबंधीं जें कांहीं सांगावयाचें तें सांगून टागोर तसेच चालत घरीं गेले.

त्यांच्या या खटपटीनेंहि श्रीमंत सयाजीराव यांची व माझी भेट झाली नसती. परंतु त्यांच्याच आश्रितांपैकीं एकादोघा गृहस्थांनीं श्रीयुत मनुभाईंनां वारंवार आठवण देऊन, दुसर्‍या कीं तिसर्‍या दिवशीं माझी भेट घडवून आणिली. महाराजांनां दहापंधरा मिनिटांपेक्षां जास्त अवकाश नव्हता. तेव्हां मला निरोप देण्यापूर्वी ते म्हणाले ''तुम्ही एकदां बडोद्याला या. पुष्कळ गोष्टी तुमच्याशीं मला बोलावयाच्या आहेत. आतां येथें मला फार कामें असल्यामुळें आणखी पांच मिनिटें बोलण्याची सोय राहिली नाहीं.''

त्यांनीं जरी मला बडोद्याला बोलाविलें होतें, तरी वीसपंचवीस दिवस कलकत्ता सोडतां आला नाहीं. पुढें नॅशनल कॉलेजांतून कांहीं दिवसांची सुट्टी घेऊन कुटुंबाला पोहोंचविण्यासाठीं मी गोंव्याला गेलों व तेथून बडोद्याला गेलों. श्रीयुत रावजी रघुनाथ शिरगांवकर या गृहस्थांची व माझी कलकत्त्याला चांगली ओळख झाली होती. या वेळीं (सन १९०७ सालीं) ते असिस्टंट खासगी कारभारी होते. बडोद्यास दुसरीकडे कोठें ओळख नसल्यामुळें यांच्याच घरीं उतरलों. मला तेथें बरेच दिवस रहावें लागलें. प्रथमतः महाराज दुसरीकडे शिकारीस गेले होते, व नंतर त्यांची चुलती की काय वारली. एवंच आठदहा दिवस महाराजांची भेट झाली नाहीं. पण मी इतके दिवस येथें आहें, असें त्यांनां समजतांच चुलतीच्या मरणानंतर तिसर्‍या दिवशीं त्यांनीं मला भेटीसाठीं राजवाड्यांत बोलाविलें. बराच वेळ संभाषण झाल्यावर ते म्हणाले ''चुलतीच्या मृत्यूमुळें प्रसिद्धपणें तुमचें व्याख्यान वगैरे राजवाड्यांत करतां येत नाहीं. तथापि पुनः या बाजूला आलांत, तर मला भेटल्यावांचून जाऊं नका.'' माझ्या जाण्यायेण्याच्या खर्चासाठीं १६० रुपये त्यांनीं खानगींतून देवविले, व माझी रवानगी केली.

पुढे वाचा