मुख्यपान » अमेरिकेंतील प्रवास
A+ R A-

अमेरिकेंतील प्रवास

ई-मेल प्रिंट
ज्याच्या आयुष्याचीं बावीसतेवीस वर्षे गोंव्यासारख्या मागसलेल्या प्रांतांत गेलीं व त्यानंतरहि बहुतेक वर्षे काशींतील मठांत किंवा बौद्धविहारांत गेलीं, त्याच्यावर अमेरिकेचा प्रवास करण्याची पाळी येणें म्हणजे जरासें विलक्षण म्हटलें पाहिजे. कधीं विजार वापरण्याची संवय नाहीं, बूट घालण्याचा अभ्यास नाहीं, यूरोपियन पद्धतीनें टेबलावर जेवण्याचा प्रसंग नाहीं, अशा परिस्थितींत माझ्या मनाची स्थिति कशीं झाली असयावी, याची वाचकांनींच कल्पना करावी. परंतु अपरिचित देशांतून प्रवास करण्याचें बरेच प्रसंग गुदरले असल्यामुळें व कलकत्त्याला असतांना कांहीं मित्रांची युरोपियन थाटाची राहणी माझ्या अवलोकनांत आली असल्यामुळें मला या नवीन प्रवासाचें वाटावें तितकें भय वाटलें नाहीं.

या वेळीं डॉ. सुखठणकर लाहोरला दयाळसिंग कॉलेजांत अध्यापकाचें काम करीत असत. माझा अमेरिकेस जाण्याचा निश्चय झाल्यावर एकदां ते मला येऊन भेटले. मी अतिशय धांदलींत असल्यामुळें ''बुद्ध, धर्म आणि संघ'' या पुस्तकाचीं शेवटलीं प्रुफेंहि त्यांनींच तपासलीं व शुद्धिपत्र तयार केलें. विलायतेच्या प्रवासांत काय काय जिनासा आवश्यक आहेत, यांची एक यादीहि त्यांनीं तयार करून दिली. या यादीप्रमाणें श्रीयुत बळवंतराव माडगांवकर यांनीं जिनसा खरेदी करण्यास मला मदत केली. पुण्याच्या स्टेशनावर माझ्या घरच्या मंडळीचें शेवटलें दर्शन घेऊन मी मुंबईस गेलों, व तेथून तारीख २३ एप्रिल १९१० रोजीं मांच्युआ (Mantua) नांवाच्या पी. ऍंड ओ. कंपनीच्या आगबोटीनें इंग्लेंडचा मार्ग धरिला. बंदरावर माझे मित्र श्रीयुत बळवंतराव माडगांवकर वगैरे मंडळी आली होती. याच बोटीनें महाराजा होळकर विलायतेला जाण्यास निघाले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी श्रीमंत सौ. सीताबाई याहि होत्या. मला ही गोष्ट मुळींच माहीत नव्हती, व असती तरी त्याच्यापासून कांहीं विशिष्ट फायदा झाला असता, असेंहि नाहीं. पण माझे मित्र प्रार्थनासमाजाचे मिशनरी श्रीयुत विठ्ठल रामजी शिंदे यांनां ही गोष्ट माहीत होती, व आगबोटीवर गैरसोय झाली असतां, मला या श्रीमंत मंडळीकडून कांहीं मदत व्हावी, या उद्देशानें त्यांनीं सौ. सीताबाई साहेबांनां एक पत्र लिहून तें धक्क्यावरच माझ्या स्वाधीन केलें. डॉ. सुखठणकर यांनींहि इंग्लंडांत बर्‍याच गृहस्थांनां माझ्यासंबंधानें लिहून ठेविलें होतें. याशिवाय डॉ. वुड्स यांनीं लिव्हरपूल येथें एका माजी आर्चडीकनला माझी व्यवस्था लावण्यासाठीं लिहिलें होतें.

आगबोटीवर मला जी सेकंडक्लास केबिन मिळाली होती, तिच्यांत एक जैन जातीचा इंग्लंडला जाणारा विद्यार्थी व त्याच जातीचा पारीस येथें जवाहिरांचा धंदा करणारा व्यापारी, असे दोघे उतारू होते. पहिल्या दिवशीं कांहीं कांहीं मंडळीला समुद्राची हवा बाधून प्रकृति अस्वस्थ होत असते; पण मला मद्रासहून व कलकत्त्याहून रंगूनला जातांना व तेथून परत येतांना तीन चार दिवस आगबोटींत घालविण्याची संवय असल्यामुळें या प्रवासांत मुळींच त्रास झाला नाहीं. एवढेंच नव्हे, तर मुंबईस दोन दिवस शौचाला वारंवार होत असून मला थोडासा तापहि आला होता; पण अरबी समुद्रांत २४ तास प्रवास केल्याबरोबर प्रकृतीला आराम वाटूं लागला. आगबोटीवरील लोणी आणि पाव इत्यादि साधें अन्न तर माझ्या प्रकृतीला फार मानवलें. सकाळीं उठल्याबरोबर चहा, कांहीं फळें व बिस्किटें किंवा पावाचे दोन तुकडे, एवढें मिळे. नंतर १० वाजता जेवण (Breakfast), पुनः १ ला न्याहारी (Lunch), नंतर ४ ला चहा, पुनः ७ ला उत्तम जेवण (Dinner) आणि रात्रीं १० ला थोडासा फराळ (Supper) असे. या सर्वांचा कांहीं यूरोपियन प्रवासी पूर्ण आस्वाद घेत असत. पण तसा प्रकार माझ्याकडून घडला असता तर संग्रहणीचा विकार विकोपाला जाऊन देहावसान होण्याची पाळी आली असती. मी व दुसरे हिंदु प्रवासी दिवसांतून दोन तीन वेळां अगदीं बेताचेंच अन्न खात होतों. आमच्यामध्यें एक तरुण देशस्थ ब्राह्मण होता. तो मात्र यूरोपियन प्रवाशांनां हार जात नसे. पहिल्याच दिवशीं त्यानें हॅम (Ham) आणि बीफ (Beef) वगैरे पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्यास सुरुवात केलेली पाहून आम्हां सर्वांस अत्यंत अचंबा वाटला ! मीं तर त्याला मराठींत असा प्रश्न केला, कीं, ''तुम्ही देशस्थ ब्राह्मण म्हणवितां आणि पहिल्याच दिवशीं आगबोटीवर हे अमेध्य पदार्थ खातां, हें कसें ?'' त्यावर तो म्हणाला ''विलायतेला जाण्याचा माझा निश्चय तीनचार महिन्यांमागेंच झाला होता, व तेव्हांपासूनच मुंबईतील हॉटेलांत जाऊन हे पदार्थ खाण्याची मीं संवय करून घेतली !'' हें ऐकून आम्ही चुप बसलों.

पुढे वाचा