मुख्यपान » अंक तिसरा
A+ R A-
ई-मेल प्रिंट
अंक तिसरा (प्रस्तावना)

ह्या अंकाचे पहिले दोन प्रवेश अत्तदण्डसुत्ताच्या आधारें लिहिले आहेत (भ. बु. १।१०४-१०६). पहिल्या प्रवेशाच्या शेवटीं, त्याचप्रमाणें पांचव्या प्रवेशांत मी ‘सत्याग्रह’ शब्द योजला आहे. तो पाहून वाचकांची अशी समजूत होण्याचा संभव आहे कीं, मी ह्या नाटकांत आधुनिक सत्याग्रह दाखल करीत आहें. परंतु बुद्धसमकालीं वैयक्तिक सत्याग्रह प्रचारांत होता हें राष्ट्रपालाच्या (मज्झिमनिकाय रट्ठपालसुत्त) आणि विनयपिटकांतील पाराजिकाकाण्डाच्या पहिल्या प्रकरणांत आलेल्या सुदिन्नाच्या गोष्टीवरून सिद्ध होतें.

राष्ट्रपाल कुरु देशांतील थुल्लकोट्ठित नांवाच्या लहानशा शहरांत (निगमे) राहणार्‍या एका धनाढ्य सावकाराचा एकुलता मुलगा होता. बुद्ध भगवान् त्या शहराजवळ आला असतां राष्ट्रपाल तेथील ब्राह्मण गृहस्थांबरोबर भगवन्ताचा धर्म ऐकण्यासाठीं गेला. धर्मश्रवणानंतर त्याची खात्री झाली कीं, गृहस्थाश्रमांत राहून परिपूर्ण ब्रह्मचर्य पालन करतां येणें शक्य नाहीं. तेव्हां त्यानें भगवन्तापाशीं प्रव्रज्येची याचना केली. त्या कामीं त्याच्या आईबापांची परवानगी पाहिजे, असें भगवन्तानें सांगितलें. त्यावर राष्ट्रपालाने घरीं जाऊन आईबापांची परवानगी मागितली. ती त्यांनीं दिली नाहीं. तेव्हां ‘मी येथेंच मरणार’ असें म्हणून राष्ट्रपाल तेथें पडून राहिला, आणि त्यानें एकामागून एक सात जेवणें वर्ज्य केली. त्यामुळें घाबरून आईबापांनी त्याच्या प्रव्रज्येला संमति दिली. अशाच प्रकारें सुदिन्नानेंहि संमति मिळविली.

बोधिसत्त्वाचा परिव्राजक होण्याचा निश्चय व प्रव्रज्याग्रहण त्याच्या आईबापांना माहित होतें, हें अरियपरियेसन व महासच्चक सुत्तांत सांपडणार्‍या मजकुरावरून स्पष्ट होतें (भ. बु. १।१११). त्याच्याच आधारें ह्या अंकाचा चवथा व पांचवा प्रवेश रचला आहे. बोधिसत्त्वाची प्रव्रज्या लुम्बिनीग्रामांत झाली कीं कपिलवस्तूंत, हें नक्की समजत नाहीं. परंतु कपिलवस्तूंत आडार कालामाचा आश्रम होता ह्याला भरपूर पुरावा असल्यामुळें (भ. बु. १।८६-८८) ती त्या आश्रमांतच झाली असें गृहित धरलें आहे.
********************************************************************************************************************************************************************


पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..