मुख्यपान » अंक चवथा
A+ R A-
ई-मेल प्रिंट
अंक चवथा (प्रस्तावना)

पंचवर्गीय भिक्षु शाक्य देशांतील ब्राह्मण असून बोधिसत्त्वानें प्रव्रज्या घेतल्यानंतर त्यांनी प्रव्रज्या घेतली असें मनोरथपूरणीचें आणि जातकअट्ठकथेचें म्हणणें. पण त्याला त्रिपिटकांत आधार नाहीं; आणि तें कांहीं अंशीं असंभवनीय वाटतें. ह्या अंकांत मी एवढेंच गृहित धरलें आहे कीं, ते शाक्य आणि कोलिय देशांतील रहिवासी असावे, आणि गृहत्यागापूर्वीच बोधिसत्त्वाचा व त्यांचा परिचय झाला असावा.

राजगृहांत बोधित्त्वाला बिम्बिसार राजा भेटला हें कथानक पब्बज्जा सुत्तांत आलें आहे(भ. बु. ११४-११६).

उरुवेलेला जाऊन बोधिसत्त्वानें सहा वर्षे तपश्चर्या केली व ती सोडून दिल्यावर पंचवर्गीय भिक्षु त्याला सोडून गेले हा कथाभाग त्रिपिटकांत बर्‍याच ठिकाणीं सांपडतो. परंतु सुजातेचा उल्लेख अंगुत्तर निकायाच्या ऐकेक निपातांत ‘एतदग्गं भिक्खवे मम साविकानं उपासिकानं पठमं सरणं गच्छन्तीनं यदिदं सुजाता सेनानिधीता’ ह्या वाक्यांतच काय तो आढळतो (बौद्ध संघाचा परिचय पृ. २३६ पहा; भ. बु. १।१३१). ज्या दिवशी बोधिसत्त्व बुद्ध झाला, त्या दिवशी सुजातेने त्याला भिक्षा दिली, हीच काय ती तिची कामगिरी असें मनोरथ पूरणी व जातकअट्ठकथेवरून दिसून येतें. परंतु ललितविस्तारांत ती व तिच्या मैत्रिणी बोधिसत्त्वाच्या खडतर तपश्चर्येच्या प्रसंगी त्याची शुश्रूषा करण्यासाठी व त्याला वंदन करण्यासाठी जात असत असें वर्णन आहे (पृ. २६५), आणि तें पालि अट्ठकथांपेक्षां प्रचीनतर आहे. त्याच्याच आधारें मी ह्या अंकाच्या चवथ्या प्रवेशाची रचना केली आहे.
*************************************************************************************************************************************


पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..