फलक
मुख्यपान » जातक कथासंग्रह
A+ R A-

जातक कथासंग्रह

ई-मेल प्रिंट
आचार्य धर्मानंदांनी बुद्धचरित्र व बौद्धधर्म यांचा वाङ्‌मयीन पाया घातला, त्या पायावर इमारत उभारायचे कार्य थोर दलित नेते डॉ. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. त्यांच्या कार्यास धर्मानंदांचा आधार मिळाला. धर्मानंदांनी लिहून प्रसिद्ध केलेले साहित्य हाच तो आधार होय. विचार हा संस्कृतीचा आधार असतो. धर्मानंदांच्या साहित्यातील विचारांचा गाभा त्रिकालाबाधित व अजरामरही आहे, असे म्हणता येते. परंतु ते काहीसे मागे पडले होते. आंबेडकर यांच्या नव्या आंदोलनाने त्या विचारांना चांगला उजाळा मिळेल. त्या वैचारिक साहित्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग आहे. त्या त्यागातून त्या साहित्याचे भव्य यश प्रकट झाले आहे. ज्या उच्च विचारांच्या पाठीमागे महान त्याग असतो, ते विचार अधिक प्रभावीपणे दीर्घकालपर्यंत मोठी प्रेरणा देत राहतात. म्हणून असे म्हणता येते की, धर्मानंदांना फार मोठा भविष्यकाळ आहे.

धर्मानंदांच्या अपरंपार त्यागाचे आणि भारतात त्यांच्या वेळी अलभ्य असलेल्या बौद्धधर्मविद्येच्या साधनेकरिता आवश्यक असलेल्या अदम्य उत्साहाचे परिणामकारी चित्र त्यांच्या ''निवेदन'' या आत्मचरित्रात पाहावयास मिळेल. देशी आणि परदेशी भाषांमध्ये आत्मचरित्र या वाङ्‌मयप्रकाराचे गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांतील शेकडो नमुने पाहावयास मिळतात. परंतु आत्मचरित्र लेखकाचा आत्मा सर्वांगीणपणे ज्यात व्यक्त झालेला असतो. अशी आत्मचरित्रे हीच खरी आत्मचरित्रे ठरतात. अशा खर्‍याखुर्‍या आत्मचरित्रांमध्ये धर्मानंदांच्या 'निवेदना'ची गणना करता येते. काही आत्मचरित्रे अशी असतात, की त्यांत सबंध आत्मा दिसतच नसतो. याची कारणे दोन : एक तर, जीवनातील वास्तव घटना, अनुभव व प्रवृत्ती यांचे चित्रण करण्यास योग्य असे शब्दसामर्थ्य असते आणि दुसरे कारण असे की, तसे शब्दसामर्थ्य असले, तरी जीवनातील अनेक घटना, अनुभव व प्रवृत्त्ती मुद्दामहून वाचकाच्या दृष्टीआड करण्याचा प्रयत्‍न असतो. कारण व्यंगे, दोष, अपराध वा गुन्हे दाखविण्याची लाज वाटते. त्यामुळे अर्धसत्यच पुढे येते आणि त्याचमुळे ते आत्मचरित्र आत्म्यास गमावून बसते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सर्व मानवांच्या जीवनात असतातच. त्यांच्यावर विजय मिळविण्यात कमीजास्त प्रमाणात अपयशही आलेले असते. जीवनातील यशांचीही ती एक अपरिहार्य अशी बाजू असते. सबंध जीवन म्हणजे आत्मा होय. सबंध आत्म्याचे दर्शन करून देणे, हे आत्मचरित्रलेखकाचे परमपवित्र कर्तव्य असते. कारण सत्यदर्शन ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. आत्म्याचे एकांगी दर्शन करवून देणारा आत्मचरित्रलेखक हा या परमकर्तव्यापासून च्युत झालेला असतो. अशा परमकर्तव्याला जागणारेही आत्मचरित्रलेखक साहित्याच्या इतिहासात सापडतात. उदा. प्रच्च राज्यव्रचंतीचा विचारप्रवर्तक रूसो याने स्वत:च्या चरित्रात स्वत:ची व्यंगे व अपराध खुल्लमखुल्ला सांगण्यास काही कमी केले नाही.

वयाच्या २३-२४ व्या वर्षी धर्मनंदानी बुद्धच्या शोधाकरिता गृहत्याग केला. त्यावेळी त्यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. मराठीशिवाय, संस्कृत, इंग्लिश किंवा इतर कोणत्याही भाषा येत नव्हत्या. एक छोटेखानी बुद्धचरित्र हाती पडले, ते वाचले आणि बुद्धदर्शनाचा वेध लागला. त्यामुळेच, बौद्ध धर्माच्या अध्ययनार्थ ते बाहेर पडले. गृहस्थिती साधारण गरिबीची होती. बाहेर पडले तेव्हा प्रवासाच्या खर्चाला कमरेला पैसा नव्हता. टक्केटोणपे खात गुरूच्या शोधात हजारो मैल सापडेल त्या वाहनाने वा पायी प्रवास केला. बहुतेक पायी प्रवास अनवाणीच केला. अनेक वेळा पाय रक्तबंबाळ झाले, उपास पडले, पुष्कळ वेळा चण्या-चुरमुर्‍यावरच भूक भागवावी लागली; वा उपाशीच राहावे लागले. गोव्याहून पुणे, मुंबई, ग्वालेर, काशी, कलकत्त्ता, नेपाळ, गया, मद्रास आणि अखेरीस लंका इत्यादी ठिकाणी बौद्ध धर्म विद्येचा गुरु शोधेत गेले. वाटेत पुणे आणि काशी येथे संस्कृत शिकले. अखेर श्रीलंकेतील बौद्ध मठात बौद्ध विद्येचे गुरु भेटले. भिक्षुदीक्षा घेतली. तेथे पाली भाषा शिकून बौद्ध धर्माच्या ग्रंथांचे सांगोपांग अध्ययन केले. बौद्ध योगाच्या अभ्यासाकरिता दोनदा ब्रह्मदेशात जाऊन आले. जिवावर अनेक आपत्ती आल्या, परंतु बौद्धधर्माच्या विद्येचा ध्यास वाढतच गेला. पाली भाषेत ज्याप्रमाणे बौद्धधर्माचे अफाट साहित्य आहे, तसेच संस्कृतमध्येही आहे. त्या दोन्ही भाषेतील साहित्यांमध्ये या सात वर्षांत धर्मयात्रेत पारंगतता मिळविली. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत चतुरस्त्र विद्वत्त्ता संपादन केली.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..