मुख्यपान » इतर साहित्य » भगवान बुद्ध
A+ R A-
ई-मेल प्रिंट
ग्रंथकारपरिचय

भगवान बुद्धावरील श्री. धर्मानंद कोसम्बींचा ग्रंथ मिळवून नवभारत ग्रंथमालेने ग्रंथकारांच्या कीर्तिमत्तेच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. पालि भाषा व बौद्ध धर्म यांत निष्णात म्हणून त्यांचे नाव जगातील विद्धन्मंडळास परिचित आहे.

धर्मानंद कोसम्बी यांचे पूर्वायुष्य हे आधुनिक काळात अत्यंत विरलत्वाने आढळणार्‍या धर्मजिज्ञासेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. केवळ तेवीस वर्षांच्या वयात तरुण पत्नीला सोडून व संसाराला लाथ मारून कल्याणकारक अशा धर्माचे ज्ञान करून घेण्याच्या तीव्र तळमळीने घराबाहेर पडलेल्या धर्मानन्दाची हकीकत वाचली म्हणजे जगतातील दु:खाचा नाश करणार्‍या धर्ममार्गाच्या संशोधनार्थ गृहत्याग करणार्‍या गोतमाचे चित्र डोळ्यापुढे आल्याखेरीज राहत नाही. सांसरिक आपत्ति कुणावर येत नाहीत? हजारो लाखो लोकांवर त्या येतात. त्या प्रसंगी मनुष्य ज्या तर्‍हेने वागतो, त्यावरूनच त्याची किंमत ठरते. गोवे प्रांतात एका लहानशा गावी १८७६ साली जन्मलेल्या धर्मानन्दावर तरुणपणी काही सांसारिक आपत्ति आल्या आणि त्याचे “चित्त प्रपंचात रमेनासे झाले.” “बुद्धावर माझी अधिकाधिक श्रद्धा जडत चालली. प्रपंचाचा जसजसा वीट येत गेला, तसतशी माझी श्रद्धा दृढ होत गेली. माझे सर्वस्व बुद्ध आहे असे वाटू लागले. कितीही संकटे येवोत, कितीहि विपत्ति भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचे ज्ञान मला झाले म्हणजे माझ्या जन्माचे साफल्य झाले असे मला वाटू लागले.” असे धर्मानंदांनीच त्या काळातल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे.

प्रबल धर्मजिज्ञासेच्या पायी इ. स. १८९९ सालच्या अखेरीस निष्कांचन स्थितीत गृहत्याग केल्यानंतर या तरुणाने जे पर्यटन केले व ज्या अतर्क्य हालअपेष्टा सोसून बौद्धधर्माचे ज्ञान व त्याबरोबरच आत्मसमाधान संपादिले, त्यांचा वृत्तांत अतीव अद्भूत व विस्मयकारक आहे. धर्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आरंभी संस्कृत शिकण्याचे धर्मानन्दांनी ठरविलें. त्यासाठी प्रथम पुण्यास, तेथून ग्वालेरीस व तेथून काशीस त्यांनी गमन केले. संस्कृत विद्येच्या या माहेरघरात त्यांची अध्ययनाची सोय सहज व चांगल्या रीतीने लागली. जेवणाच्या सोयीसाठी मात्र अन्नछत्र त्यांना पाहावे लागेल; व तेथे प्रवेशही कष्टानेच मिळाला. सुमारे दीड वर्ष व्याकरण (कौमुदी) व साहित्य यांचे अध्ययन केल्यानंतर धर्मजिज्ञासेने धर्मानंदांना नेपाळात जाण्यास प्रवृत्त केले. बुद्ध भगवानाच्या धर्माचे जिवंत अवशेष, भगवंताची जन्मभूमि असण्याचा मान ज्या राज्यास मिळाला आहे, त्या नेपाळच्या राज्यात काही तरी पाहावयास मिळतील या आशेने नेपाळात गेलेल्या या आर्त व जिज्ञासू तरुणास तेथील विपरीत परिस्थिति पाहून अत्यंत विषण्णता प्राप्त झाली. तेथून ते बुद्धगयेला गेले. बौद्ध धर्मग्रंथांचे सम्यक् ज्ञान सिंहलद्वीपात गेल्याने होईल असे तेथील एका भिक्षूने सांगितल्यावरून धर्मानन्द तेथून तडक सिलोनात जाण्यास निघाले. अपरिमित त्रास, कष्ट व संकटे सोसून ते एकदाचे सिलोनास पोचले. तेथे त्यांस अखेर पाहिजे होते ते, म्हणजे धर्माचे ज्ञान मिळाले. कोलम्बो शहराजवळ असलेल्या ‘विद्योदय विद्यालय’ नावाच्या विहारात भिक्षुधर्माने राहून त्यांनी महास्थविर सुमंगलाचार्य यांच्या हाताखाली पालि ग्रंथांचा अभ्यास केला. परंतु सिलोनांत खाण्याची आबाळ होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृति नीट राहीना, म्हणून ते सुमारे एक वर्षाने परत फिरले व मद्रास येथे आले. तेथे सहा महिने राहून अधिक अध्ययन करण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशात गेले. तेथे विहारात राहून ध्यानमार्गाचा अभ्यास केला; परंतु तेथेहि प्रकृति चांगली न राहिल्यामुळे ते पुन: हिंदुस्थानात आले. भिक्षुवेषातच सारनाथ, कुसिनारा, लुम्बिनीवन, कपिलवस्तु इत्यादि भगवान गौतमाच्या आयुष्यातील चिरस्मरणीय घटनांनी पावन झालेल्या बौद्ध क्षेत्रांच्या यात्रा त्यांनी केल्या. नंतर पुन ब्रह्मदेशात जाऊन मंदाले शहराजवळ निरनिराळ्या विहारांत राहून एक वर्षभर बौद्ध धर्मग्रंथांचा व ध्यानमार्गाचा अभ्यास केला व १९०६ च्या आरंभी हे धर्मानन्द भिक्षु पुन: कलकत्त्यास आले.

यानंतर कोसम्बींचा आयुष्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा झाला असल्यामुळे त्यात इतकी अद्भुतरम्यता व लोकविलक्षणता अनुभवास येत नाही. तथापि त्यांचे यापुढील सर्व आयुष्य स्वदेशसेवेच्या हेतूने प्रेरित झालेले असल्यामुळे ते पूर्वीच्या आयुष्याइतकेच उद्बोधक व उदात्त भासते. स्वत: एवढ्या कष्टांनी मिळविलेल्या बौद्ध धर्माच्या (व पालि वाङ्मयाच्या) ज्ञानाचा स्वदेशबांधवांमध्ये प्रचार करावयाचा या ध्येयाने यापुढील त्यांच्या क्रिया प्रेरित झालेल्या दिसतात. वंगभंगाच्या चळवळीतून निघालेल्या कलकत्त्याच्या नॅशनल कॉलेजात व कलकत्ता युनिवर्सिटीत पालि भाषेच्या अध्यापकाची जागा त्यांनी पत्करली. परंतु कोसम्बींची विशेष इच्छा आपल्या महाराष्ट्र बांधवांमध्ये बौद्ध धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करावा अशी होती. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची गाठ घेतली. त्या उदारधी नृपतीने थोड्याच अवकाशात तारेने पुढील संदेश पाठविला, “तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याहि शहरी राहत असाल तर तुम्हांला बडोदे सरकारातून दरमहा ५० रु. मिळतील व ही मदत तीन वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र वर्षांतून एखादे पुस्तक बडोदे सरकारासाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे.”  बरीच भवति न भवति करून अखेर कोसम्बींनी गायकवाड सरकारचा हा आश्रय पत्करला. यासंबंधाने खुद्द कोसम्बी म्हणतात:- “द. म. २५० रु.ची (कलकत्ता युनिवर्सिटीची) नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनी दिलेल्या ५० रु. वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीहि पश्चाताप झाला नाही. हे वेतन स्वीकारले नसते तर डॉ. वुड़्स यांची गाठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधि सापडली नसती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्नाने मुंबई युनिवर्सिटीत पालि भाषेचा प्रवेश करण्यात आला.”

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..