मुख्यपान » इतर साहित्य » भगवान बुद्ध
A+ R A-
ई-मेल प्रिंट
डॉ. जेम्स एच. वुड्स हे अमेरिकेतील सुविख्यात हार्वर्ड युनिवर्सिटीचे प्रोफेसर होते. त्यांना पालि शिकविण्याच्या निमित्ताने कोसम्बींचा त्यांच्याशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर स्नेहात होऊन ‘विशुद्धिमार्ग’ नामक बौद्ध तत्त्वज्ञान ग्रंथाच्या संशोधनाच्या कामी मदत करण्याकरिता डॉ. वुड्सनी कोसम्बींना अमेरिकेत पाचारण केले. सयाजीराव महाराजांची परवानगी घेऊन कोसम्बी यांनी १९१० च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेस प्रयाण केले. हार्वर्डमधील संस्कृत प्रभृति पौरस्त्य भाषांचे प्रमुख आचार्य प्रा. ल्यानमन यांच्या सहकार्याने कोसम्बी यांचे काम सुरू झाले. कोसम्बींनी कसून काम करून विशुद्धि मार्गाचे संशोधन १९११ च्या अखेरपर्यंत संपविले. परंतु ल्यानमनशी त्यांचे पटेना. कोसम्बींचे प्रयत्न गौण लेखून झालेले सर्व संशोधन आपल्याच नावे प्रसिद्ध व्हावे असा ल्यानमन यांचा मानस दिसला व तो आपला बेत साधत नाही असे दिसताच ते चिडले व संतापले. तेव्हा कोसम्बींनी अमेरिकेहून परत फिरण्याचा निश्चय केला व ते जानेवारी १९१२ मध्ये न्यूयार्कहून स्वदेशी यावयास निघाले.

हिंदुस्थानात आल्यानंतर प्रा. कोसम्बींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकांच्या निमंत्रणावरून फर्गसन कॉलेजात पाच वर्षांच्या कराराने पालि भाषेच्या प्राध्यापकाची नोकरी पत्करली. त्यांच्या अध्यापकत्वाच्या कारकीर्दीत बौद्धधर्माचे व पालिभाषेचे पुष्कळ विद्वान त्यांच्या हातून तयार झाले. कै. चिंतामण वैजनाथ राजवाडे, डॉ. पु. वि. बापट (फर्गसन कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. चिंतामणराव जोशी (बडोदा कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. ना. के. भागवत (सेंट झेविअर कॉलेज, मुंबई येथील पालीचे प्राध्यापक) ही सर्व कोसम्बींच्याच शिष्यमालिकेतील चमकदार रत्ने होत.

सहा वर्षे फर्गसन कॉलेजात प्राध्यापकाचे काम केल्यानंतर डॉ. वुड्स यांनी अमेरिकेत येण्याबद्दल फार आग्रह केल्यावरून ते १९१८ साली पुन: अमेरिकेत गेले. त्या वेळी महायुद्ध सुरू असल्यामुळे अमेरिकेचा हा प्रवास कोसम्बींनी पूर्वेकडून पॅसिफिक महासागरातून केला. त्याजबरोबर त्यांची मुले व श्री. पार्वतीबाई आठवले या होत्या. या खेपेस अमेरिकेत कोसम्बींचा मुक्काम सुमारे ४ वर्षे झाला. १९२२ च्या आगस्टमध्ये ते परत आले. त्यांनी तेथे संशोधनकार्य बरेच केले, परंतु ल्यानमनच्या दुराग्रहामुळे त्यांना या खेपेसहि त्रास झालाच.

कोसम्बींच्या विचारांना नवी दिशा १९११ सालच्या अमेरिकेच्या पहिल्या सफरीपासूनच लागत चालली होती. अमेरिकेत त्यांनी समाजशास्त्रावरील ग्रंथांचे- विशेषत: समाजसत्तावादाचे- खूप वाचन केले. भांडवलशाही नष्ट करून समाजाची रचना साम्यवादाच्या पायावर केल्यानेच सामान्य जनतेला सुख मिळेल व समाजातील स्पर्धा, कलही इत्यादिकांचे मूळ नाहीसे होईल, अशी त्यांची खात्री होत चालली आहे. परंतु पाश्चात्य देशात साम्यवाद मूळ धरू शकत नव्हता व सर्व राष्ट्रांचे हात हिंसा व अत्याचार यांनी बरबटलेले होते, हे त्यांस सहन होत नव्हते. “जगातील श्रमजीवी वर्गाने अशा प्रकारचा प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाही. परंतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्यांना तो सापडणार कसा?”

अशा मन:स्थितीत भांडवलशाहीचे आगर बनलेल्या अमेरिकेत अस्वस्थ चित्ताने कालक्रमणा करीत असता १९२०-२१ सालच्या गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या बातम्या तेथे एकामागून एक येऊन पोचू लागल्या. त्या वाचून कोसम्बींचे अंत:करण धन्यतेने भरून गेले. “राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगातून पार पडण्याला याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणताही असू शकत नाही,” असा त्यांचा ठाम ग्रह झाला.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..