मुख्यपान » इतर साहित्य » भगवान बुद्ध
A+ R A-
ई-मेल प्रिंट
अशा रीतीने कोसम्बी अमेरिकेहून आले ते मनाने साम्यवादी, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते बनून आले. हिंदुस्थानात आल्यावर १९२२ ते १९२५ पर्यन्त गांधीजींनी काढलेल्या गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्त्वमंदिर शाखेत पालिभाषाचार्य या नात्याने त्यांनी काम केले. या अवकाशात मराठीत व गुजरातीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. प्रा. ल्यानमन सेवानिवृत्त झाल्यामुळे ‘विसुद्धिमग्गा’चे संस्करण पूर्ण करण्याची संधि आता मिळेल या अपेक्षेने १९२६ च्या प्रारंभास धर्मानन्द पुन: अमेरिकेस गेले व सप्टेंबर १९२७ पर्यंत सर्व संस्करण छापून तयार झाल्यानंतर ते स्वदेशी परतले.

हिंदुस्थानात आल्यानंतर पत्नीला घेऊन त्यांनी सर्व क्षेत्रांच्या यात्रा केल्या व गुजरात विद्यापीठात ते पूर्वीप्रमाणे राहू लागले. १९२९ साली लेनिनग्राड (रशिया) येथील बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी स्थापिलेल्या संस्थेत काम करण्यास ते रशियात गेले. रशियातील अनुभवांचा त्यांच्या अगोदरच साम्यवादी बनलेल्या मनावर बराच अनुकूल परिणाम झाला. रशियातील हवा, राहणी व अन्न  न मानवल्यामुळे ते एका वर्षांच्या आतच, म्हणजे १९३० च्या प्रारंभी हिंदुस्थानास परत आले, येथे आले तो सर्व देश सत्याग्रहयुद्धासाठी सज्ज झालेला त्यांस दिसला. मार्चमध्ये सुप्रसिद्ध दांडीकूच झाले. धर्मानंदांनी या स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली. खेड्यापाड्यांतून प्रचार केला. शिरोडे (रत्नागिरी) येथील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला व अखेर विलेपार्ले येथील सत्याग्रह- छावणीचे प्रमुखत्व स्वीकारले. येथे त्यांना पकडल्यानंतर लवकरच हायकोर्टाने सोडून दिले. आक्टोबर १९३१ मध्ये ते डॉ. वुड्सच्या आग्रहावरून चवथ्यांदा अमेरिकेस गेले व तेथून १९३२ साली परत आले.

त्यानंतर “१९३४ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी बनारसला जाऊन राहिलो. तेथे सहा महिने हिंदु युनिवर्सिटीचा पाहुण होतो. त्यानंतर काशी विद्यापीठात आठ नऊ महिने राहिलो. विद्यापीठाच्या चालकांनी माझ्यासाठी एक लहानसे घर बांधून दिले. त्या घरात राहून मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ हे पुस्तक लिहिले.”

श्रमजीवी वर्गामध्ये बुद्धाच्या अहिंसा तत्त्वज्ञानाच्या प्रचाराने स्पृश्यास्पृश्य भेद नष्ट करून समता स्थापता येईल की काय हे पाहण्याच्या हेतूने परळच्या वस्तीत एक आश्रम स्थापन करण्याचे कार्य कोसम्बींनी यानंतर हाती घेतले. त्यांच्या हेतूनुसार १९३७ च्या जानेवारीत ‘बहुजनविहारा’ची स्थापना झाली. तेथे आपल्या उद्देशानुसार ते कार्य करू लागले.

तेथे राहून आपले उद्देश सिद्धीस जाणार नाहीत असे काही वर्षांच्या अनुभवानंतर त्यांच्या मनाने घेतले. तेव्हा ते बनारसजवळ सारनाथ येथे जाऊन राहिले. आयुष्याच्या अखेरीस जैन तीर्थंकर पार्श्वनाथप्रणित ‘चतुर्यासमधर्मा’ने त्यांचे मन विशेष आकृष्ट केले होते. त्यावर त्यांनी एक लहानसे पुस्तकहि लिहिले.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..