मुख्यपान » इतर साहित्य » भगवान बुद्ध
A+ R A-
ई-मेल प्रिंट
जैन धर्माच्या उपदेशानुसार त्यांच्या मनाने घेतले की, शरीर दुर्बळ होऊन लोकांच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होत नाहीसा झाल्यानंतर त्याला अन्न घालून त्याचे रक्षण करणे हे पाप होय. प्रायोप्रवेशन करून शरीरत्याग करणे हाच अशा स्थितीत धर्म होय, असे मानून त्यांनी अन्नत्यागास सुरवातहि केली. महात्मा गांधीजींना हे कळले तेव्हा त्यांनी कोसम्बींना या त्यांच्या बेतापासून परावृत्त केले. तथापि पार्थिव देहाचे आवरण त्यांच्या आत्म्याला तेव्हापासून मानवेनासे झाले. अखेर गांधीजींच्या सान्निध असावे म्हणून ते सेवाग्राम येथे जाऊन राहिले व तेथे ता. ५ जून १९४७ रोजी त्यांचा देहान्त झाला.

याप्रमाणे या महाभागाचे लोकविलक्षण चरित्र आहे. बुद्ध भगवानाने उपदेशिलेला कल्याणकारक धर्ममार्ग त्यांना पटला. त्यांनी तो स्वत: आचरून सर्वांस उपदेशिला. पण त्यांचे मन इथेच थांबले नाही. ते अखेरपर्यंत नवेनवे संस्कार ग्रहण करीत विकसित होत होते. मात्र हे संस्कार परस्परांशी सुसंगत असे असून एकाच मार्गावरील टप्पे असावेत तसे होते. अमेरिकेत गेल्यावर समाजशास्त्राचा अभ्यास घडून मार्क्सप्रणीत समाजवादाचे ग्रहण त्यांच्या मनाने केले. पण गांधीजींच्या समग्रजीवनव्यापी अहिंसेचे आणि सत्याग्रहाचे दर्शन जेव्हा त्यांना घडले तेव्हा खराखुरा समाजवाद, सत्य अहिंसा यांच्या मार्गानेच मानवसमाजात अवतरू शकेल अशी त्यांची दृढ धारणा झाली. त्यात अखेरीस जैनांच्या ‘चतुर्याममार्गा’च्या व्यासंगाची भर पडून वैयक्तिक जीवनाची कृतार्थता हेच परमध्येय, समाजवादाचे पर्यवसानहि त्यात झाले पाहिजे, अशी त्यांची समुच्चयात्मक जीवनदृष्टि बनली. स्वत:ला जे जे प्रतीत झाले त्याचा त्यांनी निर्भयतेने प्रचार केला.

फेब्रुवारी १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या सांगण्यावरून बडोदे येथे बौद्ध धर्मावर कोसम्बींनी व्याख्याने दिली. त्यांचे पुस्तक लगेच ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. पुढे १९१४ साली त्यांचे ‘बुद्धलीलासारसंग्रह’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या ग्रंथाचे तीन भाग असून गौतम हा बुद्ध होण्याच्या पूर्वीच्या जन्मातील काही कथा पहिल्या भागात, खुद्द गौतम बुद्धाच्या कथा दुसर्‍या भागात व बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण वर्णन करणार्‍या कथा तिसर्‍या भागात दिलेल्या आहे. ‘समाधिमार्ग’ (१९२५) व ‘बौद्धसंघाचा परिचय’ (१९२६) ही पुस्तके गुजरात विद्यापीठात त्यांनी असताना लिहिली. त्यानंतर ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ (१९३५) हे पुस्तक काशी येथे असताना लिहिले. यात त्यांनी प्राचीन भारतासंबंधीचे आपले परिणतावस्थेतील विचार व आपले सामाजिक तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. ‘विसुद्धिमग्गा’च्या संशोधनासंबंधी वर अनेकवार उल्लेख केलाच आहे. या ग्रंथाचे संस्करण अंधेरी (मुंबई) येथील ‘भारतीय विद्याभवन’ या संस्थेने नागरी लिपीत नुकतेच प्रसिद्ध केले आहे. गुजराती भाषेतहि त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

गांधीजींच्या प्रेरणेने धर्मानन्दांच्या स्मारकाची योजना करण्यात आली. तद्नुसार बौद्ध धर्म आणि साहित्य यांचे श्रद्धापूर्ण अध्ययन करण्याकरिता काही विद्यार्थी लंकेमध्ये पाठविण्यात यावेत असे ठरले. शिवाय धर्मानन्दांच्या वाङमयाचे सर्व भारतीय भाषांमधून प्रकाशन व्हावे असाहि संकल्प झाला.

धर्मानन्दजींनी आपल्या पूर्वायुष्याचा वृत्तान्त लिहिला, तो ‘निवेदन’ या नावाने पुस्तकरूपाने १९२४ साली प्रसिद्ध झाला. उत्तर आयुष्याचा वृत्तान्त त्यांनी १९३७-३८ साली ‘खुलासा’ या नावाने लिहिला. तो वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला होता.

निर्लोभता, निर्भयता, आणि ध्येयशीलता या तीन अमोल गुणांनी कोसम्बींचे चारित्र्य संपन्न होते. बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे ते नुसते पंडित नव्हते; ते पंडितांचे पंडित होते. त्यांनी आपल्या पांडित्याचा बहुजनहिताय, बहुजनसुखाय वेच केला हे त्यांचे वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यामुळे पंडितांमध्ये तसेच लोकसेवकांमध्ये त्यांचे उच्चस्थान अढळ आहे.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..