फलक
मुख्यपान » निवेदन (आत्मचरित्र)
A+ R A-
ई-मेल प्रिंट
‘ भारत ’ नांवाचें एक साप्ताहिक वर्तमानपत्र गोव्यांत निघत असतें. आरंभी तें कांहीं तरुण होतकरू मंडळी चालवीत असे. पहिल्या खेपेस अमेरिकेहून परत आल्यावर या मंडळीच्या आग्रहास्तव गृहत्याग केल्यापासून अमेरिकेहून परत येईपर्यंत माझ्या प्रवासाचा वृत्तान्त लिहिण्याच्या उद्देशानें या पुस्तकाचीं पहिलीं एक कीं दोन प्रकरणें लिहून मीं भारताच्या संपादकाकडे पाठवलीं. तीं वाचून तावत्कालिक संपादकाला हें प्रवासाचें वर्णन नसून ‘ आत्मवृत्त ’ आहे असें वाटलें, व ‘ माझा प्रवास ’ हा मथळा बदलून त्यानें ‘ आत्मवृत्त ’ हा घातला. त्या काळीं श्रीयुत शांबाराव कृष्णाजी सरदेसाई हे भारताच्या मराठी बाजूचे संपादक होते. त्यांनी दुसर्‍याच अंकात ‘ आत्मवृत्त ’ मथळा बदलून ‘ आत्मनिवेदन ’ असा नवा घातला. वस्तुतः पहिलीं दोनतीन प्रकरणें केवळ उपोद्धातादाखल होतीं; मुख्यतः प्रवासवृत्तान्त सांगावयाचा होता; आणि सर्व पुस्तकाला ‘ माझा प्रवास ’ हें नांव शोभलें नसतें असें नाहीं. तथापि श्रीयुत शांबाराव यांनी दिलेल्या नांवाला मीं विरोध केला नाहीं; आणि त्याच मथळ्याखालीं भारतात पहिलीं तेरा प्रकरणें व चवदाव्या प्रकरणाचा कांहीं भाग छापून प्रसिद्ध झाला. परंतु माझे पुष्कळ गोमांतकस्थ बांधव या प्रवासवर्णनाला ‘ आत्म ’ शब्द गाळून ‘ निवेदन ’च म्हणत असत, आणि या बाबतींत त्यांना अनुसरणें विशेष सोयीचें वाटल्यावरून या पुस्तकाला तेंच नांव दिलें आहे.

भारतांत निवेदन छापण्यास १९१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यांत आरंभ झाला व तें ९ फेब्रुवारी १९१६ पर्यंत चालू राहिलें. इतका काळ लोटण्याचें कारण हें कीं, महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर भारत नियमानें चालत नसें. प्रथमतः एकामागून एक प्रकरणें लिहून मी पाठवीत असें. पण पुनः अमेरिकेस जाण्याचा विचार ठरल्यामुळें १९१६ कीं १९१७ सालीं १४ पासून १८ पर्यंत प्रकरणें  मीं तयार केलीं, व तीं माझे मित्र श्रीयुत विष्णु रामचंद्र नाईक यांच्या हवालीं केलीं. त्यांच्यामार्फत हें पुस्तक गोव्यांत छापून घेण्याचा प्रयत्‍न होता. परंतु अनेक अडचणींमुळें तो सिद्धीस गेला नाहीं, व लेखी पाने तशीच पडून राहिली. शेवटीं, गोमान्तकांत हें पुस्तक छापणें.