फलक
मुख्यपान » बोधि-सत्व (नाटक)
A+ R A-
ई-मेल प्रिंट
धर्म-जिज्ञासा, ज्ञान-पिपासा आणि आध्यापन हेच ज्यांच्या जीवनाचे प्रेरक हेतु होते असे श्री. धर्मानन्द कोसंबी एखादें नाटक लिहितील असें कोणाला स्वप्नींही वाटलें नसतें. पण ते तरी काय करतील ? भक्कम ऐतिहासिक पुराव्यावाचून ऐक वाक्यही लिहवयाचें नाहीं अशा वृत्तीनें आजन्म ज्यांनी बोलण्या लिहिण्याचें काम केलें. त्यांना गौतम बुद्धाच्या गृहत्यागाची आणि प्रवज्याग्रहणाची नवीन व संयुक्तिक उत्पत्ति सुचली असतांना आणि ती उत्पत्ति खरी असावी असें वाटण्याइतका मुबलक पुरावा मिळूनही तो अपुरा असल्याची रुखरुख लागली असतानां त्यांना काय करावें ? शेवटीं त्यांनी आपलीं उत्पत्ति या नाटकाच्या रूपांत मांडून संतोष मिळवला.

ज्या राजपुत्रानें लहानपणींच लिपि शिकून घेऊन सर्व शास्त्रांत प्रवेश करून घेतला होता, शस्त्रविद्येंत ज्यानें प्राविण्य मिळवलें होतें. आणि ज्याला लग्न होऊन एक मूलही झालें होतें, त्याला जरा, व्याधिं आणि मरण यांची कल्पनाच नसावी आणि त्यांचे दर्शन होतांच त्याला घर सोडून जाण्याची बुद्धि व्हावी हें देखील अनैतिहासिक आणि असंभवनीय वाटतें. आणि त्या राजपुत्राला जन्म, मृत्यु, जरा आणि व्याधि यांचे जें औषध सांपडलें तें देखील जगांतील भौतिक जरा, व्याधि आणि मरण यानां दूर करूं शकले आहे असेंही नाहीं. तृष्णा नाशानें वासना-मूलक दु:खें दूर होतील, सम्यक् आजीवानें कित्येक व्याधि टळतील. सम्यक कर्मांन्ताच्या योगानें पापाकडील ओढा नाहिसा होईल. सम्यक दृष्टीनें मोह दूर होईल. पण प्रत्येक शरीराच्या वाट्याला असलेलें मरण कांहीं टळणार नाहीं. ज्या मरणाचें दर्शन राजपुत्र गौतमाला झालें होतें तें मरण तथागत बुद्धाला देखील टळलें नाही !

यावरून असेंच समजलें पाहिजे कीं ज्या गोष्टीची तळमळ बुद्धाला लागली होती आणि ज्या दु:खाचा परिहार त्याला सांपडला तें केवळ शारीरिक दु:ख नसून तें समाजिक दु:ख होतें. माणसा-माणसांतील व्यवहार जर शुद्ध असला आणि व्यक्तीचें जीवन जर असामाजिक नसलें तर व्यक्ति आणि समाज दोघेहि सुखी होतील.

नेहमीच्या व्यवहारांत जे चुकीचे आदर्श बाळगले जातात आणि राष्ट्रांराष्ट्रांच्या व्यवहारांत जी नैतिक शिथिलता आढळून येते त्याचा उपाय बुद्धाला सांपडला आणि तो त्यानें लोकांना जन्मभर उपदेशिला. पारलौकिक इतिहास-भूगोलाच्या कल्पना लोक पुराणांतून वाचतात. स्वत:च्या चुकांचें खापर दैवाच्या अथवा दैवी व्यक्तींच्या माथीं फोडतात आणि भोगविलासांनी क्षीण झाल्यानंतर दुस-या टोकाला जाऊन देहदंडन करणे हाच उपाय आहे असें मानतात, आणि ज्याप्रमाणें इहलोकीं राज्यकर्त्यांना लांच देऊन कायद्याला धाब्यावर बसवितां येते त्याचप्रमाणें देवदेवींना यज्ञयागादिकाची लांच देऊन कर्माच्या आणि कर्मफलाच्या सार्वभौम सिद्धांताच्या कचाटयांतून सुटून जाण्याची आशा बाळगतात.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..