फलक
मुख्यपान » बोधि-सत्व (नाटक)
A+ R A-
ई-मेल प्रिंट
या सर्व गोष्टींचें वैयर्थ्य सिद्धार्थाला पटलें आणि त्यानें मनुष्य जातीला या भ्रम–जालांतून सोडविण्याचा प्रयत्न केला.

या दृष्टीनें पाहतां धर्मानंदांनी येथे मांडलेली उत्पत्ति अधिक सयुक्तिक वाटते. आणि म्हणावेसें वाटतें कीं गौतमाच्या वैराग्याला कारण कांहींही झालेलें असो, प्रस्तुत नाटकांत दिलेल्या उपपत्तिनंतरच बुद्धाचा उपदेश आपल्याला आधिक चांगल्या रीतीनें पटतो. जुनें बुद्धचरित्र देखील खरोखर एक अनैतिहासिक रसिक नाटकच आहे !

प्रस्तुत नाटकांत धर्मानंदांनीं सत्याग्रह शब्द आणल्यामुळें गांधीयुगाची छाया त्याच्यावर पडलीशी दिसते. पण “सत्याग्रह” हें नांव जरी नवें असलें तरी सत्याग्रह ही वस्तु माणुसकीच्या प्रेम-धर्माला किंवा हृद्य-धर्माला अपरिचित नाहीं.

या नाटकांतील प्रत्येक प्रवेश बुद्धकालीन सामाजिक जीवनांचे एक एक दृश्य चित्रित करतो. त्यामुळें बौद्ध पर्वाचा इतिहास समजून घेण्यास प्रस्तुत नाटक बरेंच उपयोगी पडेल.

‘नाटक म्हणजे दृश्य काव्य.” या व्याखेच्या कसोटीवर प्रस्तुत नाटक कसून पाहण्याची आवश्यकता नाहीं. बोधिसत्वाच्या जीवनाची उपपत्ति लावण्यासाठीं धर्मांनंदानी निबंधाच्या ऐवजी नाटकाचा प्रकार अवलंबिला एवढेंच. तरीही नाटकाच्या तंत्रांत त्यांनी केलेली एक सुधारणा स्वीकारण्याजोगी आहे.

जुन्या रामलीलांमध्ये केव्हां केव्हां सूत्रधार सर्व वेळ रंगभूमीवर एका बाजूला उभा  असे आणि नाटकाच्या पात्रांमध्यें आणि श्रोत्यांमध्ये दुभाष्याचें काम करी पण ख-याखु-या नाटकांमध्ये सूत्रधार नाटकाला प्रारंभ करून देऊन जो गुप्त होतो ते शेवटच्या भरतवाक्यापर्यंत प्रगट होत नाहीं. नाटकांतील मुख्य मुख्य दृश्यांमध्यें सांधा जुळविण्यासाठी नाटककारांना विष्कंभकाची युक्ति योजावी लागते. यांत जरी कवीचे चातुर्य प्रगट होत असलें आणि त्यामुळें आपण ‘तदानीन्तन’ आहोंत हा भास जरी कायम टिकत असला तरी खरोखर इतकी मेहनत घेण्याचे कारण नाहीं. एका प्रवेशावर किंवा अंकावर पडदा पडला म्हणजे सूत्रधारानें स्वत: पुढें येऊन पुढील कथानकाची तयारी करून देण्यास कांहींच हरकत नाही.

*                                                        *                                                    *
एका इंग्रज लष्करी अंमलदारानें कोठेसें म्हटलें आहे कीं ‘पृथ्वीराजच्या काळापासून आजपर्यंत हिंदुलोक नवे कांहींच शिकले नाहींत आणि जुने कांहींच विसरले नाहींत.’ बुद्धकाळचें हें चित्र वाचल्या नंतर म्हणावें लागतें कीं ‘पृथ्वीराजाच्या’ ऐवजीं ‘सिद्धार्थाच्या’ काळापासून असें म्हटलें पाहिजे. आणि जर दुस-या कोणी म्हटलें कीं “कौरवा पांडवाच्या काळापासून” असेंच का म्हणाना ? तर तें ही स्वीकारावें लागेल. शाक्य आणि कोलिय यांची भांडणे आपण आजही भांडत आहोंत आणि गण-राज्यांतील दुर्बलता आजही आपण दूर करूं शकलों नाहीं.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..