फलक
मुख्यपान » बोधि-सत्व (नाटक)
A+ R A-
ई-मेल प्रिंट
सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या समाजोन्नति-कारक सद्गुणावर आधारलेल्या पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचा प्रभाव शेवटीं शेवटीं धर्मानंदजींच्या मनावर फारच पडला होता. त्याची छाया या नाटकांत देखील दिसून येते. पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माच्या मूळ तत्त्वावरच बुद्ध आणि महावीर या दोघां समकालीन सुधारकांना आपापलें तत्वज्ञान आधारलें होतें ही गोष्ट देखील धर्मानंदानीं येथें मोठ्या खूबीनें सुचविली आहे. आणि अशा रीतीनें या दोन्ही पंथानां परस्परानुकूल करण्यांत त्यांनी मोठीच सांस्कृतिक कामगिरी बजावली आहे.

“बोधिसत्व” नाटकाचें हस्तलिखित वाचल्यानंतर मी धर्मानंदजीनां म्हणालों कीं ज्या प्रमाणें भवभूतिनें “महावीरचरित” आणि “उत्तररामचरित” अशा दोन नाटकांत मिळून रामजीवन    आणलें आहें. त्याच प्रमाणें “बोधिसत्व” या बुद्धाच्या पूर्वचरित्रानंतर बुद्धाविषयीं “तथागत” नाटक लिहून बुद्धचरित पूरें कां करीत नाहीं ? ते म्हणाले बौद्ध समाजाला तें आवडणार नाहीं. बोधिसत्व गौतम एकदा बुद्ध झाल्यानंतर त्याला नाटकाचा विषय करणें बौद्धांच्या भावनानां मान्य नाहीं.”

बुद्ध-जीवनांत नाट्यानुकूल प्रसंग शोधलेच तर ते सांपडणार नाहींत असें नाहीं. पण धर्मचक्र-प्रवर्तनानंतरच्या कल्याणमय जीवनांत विशेष उठावदार असा मोठा प्रसंग दृश्य-काव्यांत दाखविता येणे सोपें नाहीं.
*                                                                 *                                                                    *
हिंदुधर्मांमध्यें, प्राचीन काळचे यज्ञयाग, त्यानंतरच्या स्मृतींतून व्यक्त झालेलें कर्मकांड आणि वर्णाश्रम धर्माचा विस्तार, त्या बरोबरच उपनिषद् काळापासून चालत आलेली तत्त्वज्ञानाची चर्चा आणि आत्म्यापरमात्म्याचा शोध या गोष्टी महत्वाच्या आहेत. यांतूनच पुढें योगमार्गाची साधना उत्पन्न होऊन तिला हठयोग आणि राजयोग असे दोन फाटे फुटले.

पुढे मंत्र आणि तंत्र यांचे प्रस्थ माजलें. व्रतें आणि उत्सव यांचे मोठें अरण्य फोफावलें आणि हिंदुधर्म म्हणजे एक महाकांतार होऊन बसला.

या सर्व जटिलतेमधून धर्मतत्त्वांना वाचविण्याचें काम भगवान बुद्ध भगवान महावीर यांनी आणि त्यांच्यानंतर आलेल्या साधुसंतांनी केलें. आत्मविकासाला बाधक अशा वासनांवर विजय मिळवावा, सदाचारानें चालावें, अहंकाराचा नाश करावा, समाजाची बिघडणारी घडी त्यागधर्म आणि दानधर्म यांच्या द्वारा सुधारत जावी आणि कोणत्याही इष्ट देवतेची भक्ति करून जीवनाचें सार्थक कारावें हाच या धर्माचा गाभा होय. वर्णव्यवस्थेनें समाजांत उच्चनीच भाव उत्पन्न केला आणि व्यक्तीचें जीवन एकांगी केलें. आणि जातिभेदानें तर समाजाचे तुकडेच पाडले. यांचा थोडाफार विरोध या सर्व सुधरकांनी केला. हीच परंपरा सध्याच्या काळीं ब्राह्मसमाजानें, स्वामी विवेकानंदांनीं आणि गांधीजींनीं पुढें चालविली आहे. या प्रवृत्तिविषयी साहानुभूति किंवा आत्मीयता बाळगणा-यांनी धर्मानंद कोसंबींचीं शेवटची दोन पुस्तकें – “पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म” आणि “बोधिसत्व” यांचें विशेष आस्थेनें अध्ययन केलें पाहिजे.

१६-९-४९

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..