मुख्यपान » इतर साहित्य » हिन्दी संस्कृति आणि अहिंसा
A+ R A-

विभाग पहिला - वैदिक संस्कृति

ई-मेल प्रिंट
२६. तम्मूज् किंवा दमूनः याचीं वर्णनें ऋग्वेदांत थोड्या ठिकाणीं आढळतात. ‘अपश्चिदेष विभ्वो दमूनाः प्र सध्रीचीरसृजद्विश्वश्चन्द्राः ’ ऋ० ३।३१।१६, ‘ नित्यश्चाकन्यात्स्वपतिर्दमूना यस्मा उ देवः सविता जजान ’ ऋ० १०।३१।४, इत्यादि ऋचांतून तम्मूजचें वर्णन असावें.

२७. याशिवाय अनेक ठिकाणीं इन्द्राला मेष ही संज्ञा लावलेली दिसते. ‘ अभि त्यं मेषं पुरुहूतमृग्मियमिन्द्रं ’ ऋ० १।५१।१, इत्यादि ऋचांतून हा उल्लेख सांपडतो. येथें सायणाचार्य मेष पदाचा ‘ शत्रुभिःस्पर्धमानं ’ असा अर्थ करतात. पण तो कसा होऊं शकतो हें समजत नाहीं. सुमेरियांतील मेष ( Mes ) देवतेचा हा उल्लेख असला पाहिजे. त्याचप्रमाणें पाताळदेवता अल्लतु
(Allatu) हिंचे वैदिक रूपांतर अराति ह्या शब्दांत झालें असावें.

२८. येथें केलेलीं सर्वच अनुमानें तंतोतंत बरोबर आहेत असा माझा आग्रह नाहीं. एकतर मजपाशीं सुमेरियन आणि अक्केडियन इतिहास-पुराणावर लिहिलेले दोनच ग्रन्थ आहेत,१  व बाबिलोनियन इतिहास आणि पुराण यांचा बोध होण्यास ते पुरेसे नाहींत. याशिवाय मला सुमेरियन व अक्केडियन भाषांचें ज्ञान नाहीं. तेव्हां त्या भाषांतील ऐतिहासिक स्थळांचीं व देवतांचीं नांवें वेदांत कोणत्या रूपानें आलीं हें सांगतां येणें शक्य नाहीं. बाबिलोनियन इतिहास-पुराणाचा निकट संबंध वैदिक वाङ्मयाशीं आहे, एवढेंच दाखवण्याचा माझा उद्देश आहे. तो सिद्धीस गेला आहे कीं काय हें तज्ज्ञांनी सांगावें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ हे दोन ग्रंथ म्हटले म्हणजे History of Summer  and Akkad, and History of Babylon, by L.W. King हा एक, आणि Myths of Babylonia and Assyria, by D.A. Mackenzie हा दुसरा. )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..