मुख्यपान » इतर साहित्य » हिन्दी संस्कृति आणि अहिंसा
A+ R A-

विभाग पहिला - वैदिक संस्कृति

ई-मेल प्रिंट
३७. अक्केडियन सेमेटिकांनी सुमेरियावर जय मिळवल्यावर सुमेरियांतील जीं लहानसहान शहरें होतीं तीं एकवटली गेलीं;  आणि सुमेर व अक्काड एका साम्राज्यछत्राखालीं आलें. तेव्हांपासून तेथील बहुतेक सार्वभौम राजांची पूजा सुरू झाली. तोच प्रकार सप्तसिंधु प्रदेशांतहि झाला असावा. दास लोक लहानसहान शहरांतून रहात असत; व या शहरा-शहरांत लढाया होत असत. वृत्र हा जरी नांवाचा प्रमुख होता, तरी सर्व शहरांवर त्याची सत्ता होती असें दिसत नाहीं. तेव्हां आर्य लोकांना वृत्राचा पराभव करणें सोपें गेले.

३८. दास लोक रजपुतांप्रमाणें शूर होते असें दिसतें. पण एकोपा नसल्यामुळें व घोडदळ नसल्यामुळें आर्यांना तोंड देणें त्यांना शक्य नव्हतें. नमुचि दासानें तर आपल्या राज्यांतील स्त्रियांना देखील इन्द्राबरोबर लढावयास लावलें, याचा उल्लेख ऋ० ५।३०।९, येथे सांपडतो. ‘स्त्रियो हि दास आयुधानि चक्रे किमा करन्नवला अस्य सेनाः ।’ (दासानें स्त्रियांना देखील लढायला लावलें. पण असली दुर्बळ सेना काय करणार ? ) अर्थात् नमुचि या लढाईंत मारला गेला.

३९. शंबर दासाचीं तर इन्द्रानें नव्याण्णव शहरें तोडलीं. ‘ नवतिं च नवेन्द्रः पुरो व्यैरच्छम्बरस्य ’ ऋ० २।१९।६. दुसर्‍या एका ऋचेंत शंभर शहरें तोडलीं असा उल्लेख आहे. ‘यः शतं शम्बरस्य पुरो विभेदाश्मनेव पूर्वीः’ ऋ० २।१४।६. असें असतांहि शंबरानें चाळीस वर्षें पर्यन्त इन्द्राला दाद दिली नाहीं. ‘यः शम्बरं पर्वतेषु क्षियन्तं चत्वारिंश्यां शरद्यन्वविन्दत् ’ ऋ० २।१२।११. म्हणजे शंबराचा मैदानांत पराभव झाल्यावर पर्वतांचा आश्रय धरून तो चाळीस वर्षेंपर्यन्त इन्द्राच्या आर्यांवर छापे घालीत होता, व चाळीसाव्या वर्षीं त्याला पकडून इन्द्रानें ठार केलें.

४०. साम्राज्याच्या अन्तिम काळची स्थिति म्हटली म्हणजे आपसांतील फुटाफूट होय. ही सर्व साम्राज्यांच्या इतिहासांत दिसून येते. दासांनी साम्राज्य स्थापन केलें होतें असें दिसत नाहीं. पण त्यांच्यांत आपसांतील दुही मात्र मुबलक होती. उदाहरणार्थ, त्वष्टा हा ब्राम्हण असून वृत्राला मारण्यासाठीं वज्र तयार करतो व तें इन्द्राला देतो. ‘ त्वष्टास्मै वज्रं स्वर्यं ततक्ष ’ ऋ० १।३२।२. हें वज्र कशा तर्‍हेचें होतें तें समजत नाहीं. झेंधिश खानानें चीन देश काबीज केला व तेथील कारागिरांच्या मदतीनें त्यानें एक लांकडी यंत्र तयार केलें. तटबन्दीची शहरें तोडण्यासाठीं तो त्याचा उपयोग करीत असे. जेथें दगड नसत तेथें त्याच्या पदरचे लोक उंटावरून किंवा खटार्‍यांतून बाहेरून दगड आणीत, व त्या यंत्रावरून ते दगड भराभर तटबंदीच्या शहरांत फेंकीत. त्याचप्रमाणें शहरांतील घरें जाळण्यासाठीं त्या यंत्रावरून मोठमोठाले जळके कांकडे फेंकीत असत. त्वष्ट्यानें इन्द्रासाठीं तयार केलेलें वज्र अशाच प्रकारचें असावें. त्यायोगें इन्द्रानें दासांची शहरें उध्वस्त करून टाकलीं. याचा मोबदला त्वष्ट्याला असा मिळाला कीं, त्याच्या मुलाला—त्रिशीर्षाला—इन्द्रानें आपलें पौरोहित्य दिलें.

४१. पुढें त्रिशीर्षा आपल्या विरुद्ध बंड करील असें वाटल्यावरून त्याला इन्द्रानें ठार केलें. या त्रिशीर्षाला विश्वरूप असेंहि म्हणत असत. त्याचा उल्लेख तैत्तिरीय संहितेंत आला आहे तो असाः—“विश्वरूपो वै त्वाष्ट्रः पुरोहितो देवानामासीत् स्वस्त्रीयोऽसुराणां.....तस्मादिंद्रोऽबिभेदीदृङ् वै राष्ट्रं वि परावर्तयतीति तस्य वज्रमादाय शीर्षाण्यच्छिनत्......तं भूतान्यभ्यक्रोशन्ब्रम्हहन्नितिः ।” (विश्वरूप नांवाचा त्वष्ट्याचा मुलगा व असुरांचा भाचा देवांचा पुरोहित होता.......तो बंड करील अशी भीति पडल्यामुळें इन्द्रानें त्याचीं डोकीं तोडलीं १ ...तेव्हां लोक इन्द्राची ब्रम्हहा म्हणून निंदा करूं लागले.) [तै० सं० काण्ड २।५।१ ]
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ विश्वरूप त्रिशीर्षाचीं डोकीं तोडल्याचा उल्लेख ऋ० १०।८।८-९ येथे सांपडतो. ‘ त्वाष्ट्रस्य चिद्विश्वरूपस्य गोनामा चक्राणस्त्रीणि शीर्षा परा वक्.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..